३८७ नवीन शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर
By Admin | Updated: July 12, 2015 02:23 IST2015-07-12T02:23:15+5:302015-07-12T02:23:15+5:30
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठही तालुक्यात शनिवारी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

३८७ नवीन शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर
वर्धा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठही तालुक्यात शनिवारी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाच्यात जिल्ह्यात ३८७ नवीन शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर ११४ कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. सोबतच ९९ प्रकरणांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सहकारी बँकेची बिकट परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता पुढाकार घेतला. वेळोवेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मिटींग घेत बँकांना शेतकऱ्यांची कर्ज पुनर्गठन करणे, नवीन कर्ज देणे या बाबींचा आढावा घेतला. यात त्यांना विशेष लाभ मिळाला नसल्याने प्रत्येक तहसील कार्यलयात पीक कर्ज मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्याला एकूण ९६९ शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. हिंगणघाट येथे आ. समीर कुणावार उपस्थित होते. तसेच तीनही उपविभागीय अधिकारी लिड बँक मॅनेजर, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची सुद्धा वेगवेगळ्या तहसीलमध्ये नेमणूक करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व तहसीलदार यांनी यशस्वीरित्या मेळाव्याचे आयोजन केले. लागणारे कागदपत्र उपलब्ध करून देण्याकरिता सर्व तलाठी व संबंधीत कर्मचारी हे त्यांच्या अभिलेखासह तहसील कार्यालयात उपस्थित होते.(प्रतिनिधी)