३८ सोनोग्राफी यंत्रांची होणार तपासणी

By Admin | Updated: April 30, 2015 01:51 IST2015-04-30T01:51:26+5:302015-04-30T01:51:26+5:30

गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील ३८ सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

38 Sonography instruments will be inspected | ३८ सोनोग्राफी यंत्रांची होणार तपासणी

३८ सोनोग्राफी यंत्रांची होणार तपासणी

वर्धा : गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील ३८ सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. सोनोग्राफी यंत्र वापराबाबत मार्गदर्शक सूचना करून सल्लागार समितीच्यावतीने आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड यांनी दिली.
गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमांतर्गत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी माध्यमांसह विविध समाजसेवी संस्था, वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींसाठी कार्यशाळा आयोजन करण्यासोबतच मुलींचे प्रमाण कमी असलेल्या तालुक्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्याची सूचना यावेळी समितीतर्फे करण्यात आली. जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढविणे, हे उद्दीष्ट आहे़ यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट अंतर्गत सोनोग्राफी मशीन बसविण्यापूर्वी समितीची मान्यता आवश्यक आहे़ बुधवारी पार पडलेल्या बैठकीत डॉ. रजनी रमेश राका हिंगणघाट राका सोनोग्राफी सेंटर यांची नवीन मशीन खरेदी, डॉ. अनिल सतई कारंजा (घा़) यांचे नवीन सेंटर मान्यता व नवीन सोनोग्राफी मशीन खरेदी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे नवीन सोनोग्राफी मशीन तसेच डॉ. प्रिया काळे यांचे नवीन सोनोग्राफी सेंटर मान्यता व नवीन सोनोग्राफी खरेदीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला डॉ. अनुपम हिवलेकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. दीक्षित, डॉ. भिसे, डॉ. वावरे, सामाजिक कार्यकर्त्या आशा लोटे, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक अ‍ॅड. कांचन बडवाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदीया आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)

गर्भलिंग निदान टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
गर्भधारणा व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करून स्त्रीलिंगी भ्रूण असल्यास ते काढून टाकण्याच्या प्रमाणात अतोनात वाढ झाली होती़ यामुळेच बहुतांश ठिकाणी मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट आली होती़ हा प्रकार टाळण्याकरिता सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती़ यात अनेक केंद्र बंद करण्यात आल्यानंतर गर्भलिंग निदानावर आळा घालण्यात प्रशासनाला यश आले़
यात आणखी सुधारणा करता यावी, मुलींच्या प्रमाणात वाढ करता यावी, गर्भलिंग निदान पूर्णत: बंद करता यावे यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण ३८ सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ शिवाय नवीन सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली़

Web Title: 38 Sonography instruments will be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.