समाधान शिबिरात ३७९३ प्रकरणे

By Admin | Updated: November 8, 2015 02:06 IST2015-11-08T02:06:07+5:302015-11-08T02:06:07+5:30

तहसील कार्यालयातर्फे जुन्या तहसीलच्या प्रांगणात शनिवारी समाधान शिबिर घेण्यात आले.

37 9 3 cases in the solution camp | समाधान शिबिरात ३७९३ प्रकरणे

समाधान शिबिरात ३७९३ प्रकरणे

पंकज भोयर : नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली काढा
सेलू : तहसील कार्यालयातर्फे जुन्या तहसीलच्या प्रांगणात शनिवारी समाधान शिबिर घेण्यात आले. यात विविध मुद्यांची ३ हजार ७९३ प्रकरणे दाखल झाली. बहुतांश प्रकरणे निकाली काढली गेली. यावेळी खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, जि.प. सदस्य राणा रणनवरे, पं.स. सभापती मंजूषा दुधवडे, उपसभापती मंजूषा पारसे, पं.स. सदस्य अशोक कलोडे, न.प. सदस्य चुडामन हांडे, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, भाजपचे बाबा तडस, कृउबास उपसभापती रामकृष्ण उमाटे उपस्थित होते.
समाधान शिबिरात नवीन राशन कार्डचे २७३, दुय्यम राशन कार्डचे १४४६, राशन कार्डवरून नाव कमी करणे ९७, नवीन नाव चढविणे १३३ असे १९४९ प्रकरणे सादर करण्यात आली. आपसी वाटणी पत्राची ९०, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र २३०, जातीचे प्रमाणपत्र १८८, नॉन क्रिमिलीयर १०३, अधिवास ३५, उत्पन्न १८७ असे एकूण ५१३ तसेच संजय गांधी योजनेचे २०७, इंदिरा गांधी योजनेचे १२३, श्रावण बाळ योजनेचे ३०३, राष्ट्रीय कुटूंब योजनेचे आठ असे ६४१, वर्ग २ ची शेत जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे ३७० प्रकरणे शिबिरात ठेवण्यात आली. एकूण ३ हजार ७९३ प्रकरणे ठेवण्यात आली. यातील अनेक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली.
यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांनी, दफ्तर दिरंगाईमुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असतात; पण यापुढे असे चालणार नाही. गोरगरिब व सामान्यांनी किती दिवस सरकारी कार्यालयाचे उबंरठे झिजवायचे. आता महाराज्यस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली काढा, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात अनेक समस्या आहे. त्या सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे. तहसील कार्यालयाशी नागरिकांची अनेक प्रकरणे असतात; पण ती वेळीच सोडविली जात नाही. यामुळे सरकारने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. आजच्या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह प्रकरणे सादर करावी, जेणेकरून त्यात त्रुटी निघणार नाही. ज्यांची प्रकरणे पुर्ण आहे, त्यांचे प्रकरण त्वरित निकाली काढण्यात येईल. जर कुणाचे प्रकरण निकाली निघाले नाही तर त्यांनी तक्रार करावी. मी संबंधितांना योग्य त्या सूचना देईल. आमदार म्हणून तुमच्या समस्या सोडविणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
खासदार तडस म्हणाले की, सरकारने एक चांगले अभियान सुरू केले आहे. ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. कापसापासूनही फारसी अपेक्षा राहिलेली नाही. आजपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांसाठी धोरण आखले नाही. परिणामी, शेतकरी देशोधडीला लागला. सिंचनाची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाची सोय मिळावी, यासाठी भाजप सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी सलील यांनी शिबिर आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहे, असे त्यांनी सांगितले. शिबिरात जी प्रकरणे निकाली निघाली नाही, ती नंतर त्वरित निकाली काढली जातील, असे सलील यांनी सांगितले. शिबिरासाठी ग्रामीण भागातून आबालवृद्ध आले होते. संचालन करीत उपस्थितांचे आभार तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 37 9 3 cases in the solution camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.