लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. वाहतूक भत्ता मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दिला जात आहे. याचा फायदा घरापासून दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील पाच पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिले ते आठवीपर्यंतच्या तब्बल ३६८ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडू प्राप्त झाली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या गावांमध्ये वस्तीमध्ये किंवा वाड्यांमध्ये घरापासून एक कि.मी.पर्यंत शाळा नसल्यास आणि सहावी ते आठवीपर्यंत तीन कि.मी.पर्यंत शाळा नसल्यास वाहतूक भत्ता म्हणून प्रतिमाह ३०० रुपये वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या राहत्या घराची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे या ठिकाणी पाठविली आहे. शाळा किंवा माध्यमिक शाळा ज्या गावांमध्ये नाही, तसेच शाळेपासून विद्यार्थ्याचे घर हे अधिक अंतरावर आहे, ज्यांचा नजीकच्या शाळेत समावेश होणार नाही. अशा कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे.
१० महिन्यापर्यंत मिळतो भत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठविण्यासाटी त्यांना समग्र शिक्षण विभागाने वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेतला असून अशा विद्यार्थ्यांना प्रतीमहा ३०० रुपये वाहतूक भत्ता १० महिन्यांपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ही आहेत कारणे... ज्या गावांमध्ये शाळा किंवा माध्यमिक शाळा नाही. तसेच विद्यार्थ्यांचे घर हे शाळेपासून जास्त अंतरावर आहे. ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा सगळ्या मुद्द्यांवर शिक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठविण्यासाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेतला. कुठे पाचवा वर्ग नाही तर कुठे सहावा वर्ग नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठविण्यात येत आहे.