दुरूस्तीचे " ३.५० कोटी पडून
By Admin | Updated: May 18, 2014 23:47 IST2014-05-18T23:47:43+5:302014-05-18T23:47:43+5:30
राज्यमार्ग क्रमांक २४४ वरील तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता बांधकाम

दुरूस्तीचे " ३.५० कोटी पडून
राज्यमार्ग खड्ड्यात: कामाचा शुभारंभ नाही
आष्टी(शहीद) : राज्यमार्ग क्रमांक २४४ वरील तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता बांधकाम विभागाकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले, ते येथील बांधकाम विभागाला मिळालेही. असे असले तरी या राज्यमार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. अशात पावसाळा काही दिवसांवर आला आहे. या पावसाच्या दिवसात रस्त्याचे काम कसे होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. तळेगाव ते आष्टी हा १२ किमी तर आष्टी ते साहूर हा रस्ता १७ किमीचा आहे. या रस्त्यावरून दिवसरात्र जड वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहन रस्त्यावरून धावत असल्याने येथे मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यावर वाहन चालवितांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकी चालक खड्ड्यांमध्ये जावून अनेकवेळा अपघात झाले आहेत. यात गत पाच वर्षांत ३०५ लोकांना जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केले; मात्र या मार्गाने जड वाहतूक असल्याने केलेली डागडुजी लगेच उखडून खड्डे उघडे पडतात. सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्याचे नुकसान झाले. त्याची डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये प्राप्त झाले. आचारसंहिता सुरू असल्याने काम करता आले नाही. त्यामुळे आता आठवडाभरात काम करणार असल्याचे सांगण्यात येते. सदर राज्यमार्गावरील जुना रस्ता काढून संपूर्ण रस्ता नविन करण्याची मागणी गत पाच वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे; मात्र निगरगट्ट शासकीय यंत्रणेला प्रवाशी हिताशी काही देणेघेणे नसल्याची प्रतिक्रिया या रस्त्याने प्रवास करणार्यांकडून उमटत आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)