लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
By रवींद्र चांदेकर | Updated: July 14, 2025 22:54 IST2025-07-14T22:54:26+5:302025-07-14T22:54:49+5:30
साती गावाचे नाव सातासमुद्रापार; भारतातील केवळ तिसऱ्या पुरस्कारार्थी

लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
रवींद्र चांदेकर, वर्धा: हिंगणघाट तालुक्यातील ‘साती’ या छोट्याशा गावातील स्नुषा ॲड. वर्षा लक्ष्मणराव देशपांडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात त्यांना ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (१९८३) आणि उद्योग विश्वातील पितामह जमशेदजी टाटा (१९९२) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या केवळ तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
साती (वरूड) हे ॲड. वर्षा देशपांडे यांचे सासर आहे, तेथील संजीव बोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बोंडे यांची गावात शेती आणि घर आहे. ते सतत गावाच्या संपर्कात असतात. ॲड. वर्षा देशपांडे यांचे माहेर कर्नाटकातील बेळगावचे आहे. त्यांचे वडील नोकरीमुळे कोल्हापुरात आले होते. हे दाम्पत्य सध्या सातारा येथे वास्तव्याला आहे. ॲड. वर्षा यांनी १९८८ मध्ये झोपडीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली. १९९० मध्ये त्यांनी दलित महिला विकास मंडळाची स्थापना केली. त्यांनी एचआयव्हीग्रस्त ट्रक चालक, क्लीनर, फिरता वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी प्रकल्प चालविले. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्टिंग ऑपरेशन करून जवळपास १८० डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यांना आतापर्यंत २० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
३५ वर्षांपासून लैंगिक समानतेसाठी लढा
ॲड. वर्षा देशपांडे यांचे पती संजीव बोंडे हे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आता ते निवृत्त आहेत. ॲड. देशपांडे यांनी गेल्या ३५ वर्षांत भारतात लैंगिक समानतेसाठी काम केले. त्यांनी जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या स्तरांवर काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’तर्फे त्यांना ११ जुलै रोजी न्यूयॉर्क येथे हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
१९८१ पासून दिला जातो पुरस्कार
हा पुरस्कार १९८१ पासून दरवर्षी एका व्यक्तीला प्रदान केला जातो. हिंगणघाट तालुक्यातील छोट्या गावातील स्नुषेला जागतिक सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने तालुका आणि जिल्ह्याचे नाव गौरवांकित झाले आहे. ॲड. वर्षा देशपांडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लिंग आधारित गर्भ निवड आणि घटणारे लिंग गुणोत्तर याविरुद्ध संघर्ष केला. या संघर्षाला पुरस्काराच्या रूपाने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. पुरस्कारामुळे या संवेदनशील विषयाकडे नव्याने लक्ष केंद्रित होईल.
-ॲड. वर्षा देशपांडे