३४ वर्षांनंतर पं.स.ला हक्काची इमारत
By Admin | Updated: February 29, 2016 01:42 IST2016-02-29T01:42:11+5:302016-02-29T01:42:11+5:30
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या ..

३४ वर्षांनंतर पं.स.ला हक्काची इमारत
बांधकामाला प्रारंभ : २ कोटी २५ लक्ष रूपयांचे प्रावधान
आष्टी (शहीद) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून राज्य शासनाने शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा बहाल केला. तेव्हापासून पंचायत समितीला हक्काची इमारत नव्हती. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर २ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. यातून बांधकाम सुरू झाले असून वर्षभरात इमारत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
१२ हजार ५०० फुट एवढ्या विस्तीर्ण जागेवर १८ प्रशस्त खोल्या, दोन मोठे हॉल अशी इमारत प्रस्तावित आहे. जोत्याचे काम पूर्ण झाले असून कॉलमची उंची सज्जा पर्र्यंत सात फुट पूर्ण झाली आहे. बसस्थानकापासून अवघ्या ३०० मीटरवर पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीला लागूनच लोकमान्य विद्यालय आहे. ही इमारत राज्यमार्गाला लागून असल्यामुळे सोयीचे होणार आहे. इमारत बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आर्वी उपविभागांतर्गत सुरू आहे. शाखा अभियंता प्रमोद चाफले स्वत: उपस्थित राहून बांधकाम करून घेत आहे. उपविभागीय अभियंता अनिल भडांगे यांच्याकडूनही वेळोवेळी पाहणी होत आहे.
मध्यवस्तीतील पं.स. कार्यालयामुळे वाहतुकीचा खोळंबा
आष्टी (शहीद) : सद्यस्थितीत मध्यवस्तीतील इमारतीमध्ये पंचायत समितीचा कारभार सुरू आहे. येथे अपुरी जागा आणि वाहतुकीचा प्रश्न सतत भेडसावत होता. हक्काची इमारत व्हावी म्हणून तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. वर्धा येथील कंत्राटदार चौधरी यांना कामाचे कंत्राट मिळाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि.प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विलास कांबळे, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांनी नुकतीच भेट देऊन कामाची पाहणी केली. वर्षाअखेरीस काम पूर्ण होण्याचा अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. शासनाकडून टप्याटप्याने निधी येणे सुरू आहे. जितक्या लवकर पूर्ण निधी येईल तितक्या लवकर बांधकाम पूर्ण होणार आहे.(प्रतिनिधी)