३२,३५२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
By Admin | Updated: February 7, 2015 23:27 IST2015-02-07T23:27:58+5:302015-02-07T23:27:58+5:30
जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला.

३२,३५२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
हवामान पीक विमा : लवकरच रक्कम बॅक खात्यात होणार जमा
वर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. या सर्वच शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना १६ कोटी १४ लाख ९० हजार रुपये मिळणार असून ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कधी पावसाची दडी तर कधी अती पाऊस यामुळे शेतातील उभे पीक खराब झाल्याची उदाहरणे आहेत. शासनाच्यावतीने कधी मदत मिळते तर कधी नुकसानीचा भार शेकऱ्यांनाच सहन करावा लागतो. या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता कृषी विभागाच्यावतीने हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाल्याचे समोर येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादकांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नुकताच सर्व्हे झाला असून यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ही योजना अंमलात येताच जिल्ह्यातील २१ हजार ४३७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरविला. या सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून त्यांना १३ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तर १० हजार ९१५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पिका उतरविला.
या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानिपोटी त्यांना २ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपयांची भरपाई संबंधीत कंपनीकडून देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकारातील किती रक्कम देण्यात येणार याची माहिती मिळाली असून ती नेमकी केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची माहिती मात्र देण्यात आली नाही. रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.(प्रतिनिधी)