३०५ गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:36+5:30
गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार करण्यात आली.

३०५ गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : गरिबांचेही घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना आहे. याकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, गरजूंना या योजनेला लाभ मिळाला नसून ३०५ गरजू गरीब, नागरिकांना घरकुलाची चार वर्षांपासून प्रतीक्षा कायम आहे.
गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार करण्यात आली. मात्र, घोडे कुठे अडले, हे कुणालाही कळू शकले नाही. त्यामुळे तीनशेवर गरजू नागरिकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. शासनाने घरकूल लाभार्थ्यांसाठी आता अ,ब,क,ड यादीचा निकष लावला आहे. या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून अनेक गरजू व गरीब नागरिकांची नावे यातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी वंचित आहे. यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी आहे.
घरकुल मिळणार तरी कधी?
ग्रामपंचायतीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. आता लाभार्थ्यांकडून आधार कार्ड घेतले जात आहे. चार वर्षांपासून प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याने घरकुल मिळणार तरी केव्हा, असा सवाल लाभार्थ्यांनी केला आहे.
केवळ दहा जणांना घरकुलाचा लाभ
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोणत्याही प्रवर्गातील नागरिकांना दिला जातो. मात्र प्रपत्र ब नुसार गावात घरकुल योजना सुरू आहे. २०१६ पासून ओबीसी प्रवर्गातील केवळ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार योजनेकरिता आधार कार्ड झेरॉक्स प्रत गोळा करून लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाभार्थ्यांच्या नावाची यादी प्राप्त होताच घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.
अशोक गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी, अल्लीपूर