बोर अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी ३० पाणवठे
By Admin | Updated: May 27, 2014 01:02 IST2014-05-27T01:02:45+5:302014-05-27T01:02:45+5:30
बोर अभयारण्यामधील वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्यात अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने वनविभागातर्फे नैसर्गिक तसेच कृत्रिम

बोर अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी ३० पाणवठे
वर्धा : बोर अभयारण्यामधील वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्यात अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने वनविभागातर्फे नैसर्गिक तसेच कृत्रिम ३० पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी वनविभागातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात जंगलातच पाणी उपलब्ध झाले आहे. बोर अभयारण्य तसेच न्यू बोर अभयारण्य १३७.१० चौरस किलोमीटर परिसर व्यापलेला आहे. राज्यातील जैविकविविधता आणि विपूल वनसंपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या अभयारण्यात आहे. उन्हाळ्यामध्ये वन्यप्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोर प्रकल्प आहे. त्यासोबतच नैसर्गिक आणि कृत्रिम अशी ३० पाणवठेसुद्धा या क्षेत्रात आहेत. यापैकी १३ पाणवठ्यांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे दिवसभर सोलरपंपाद्वारे पाणवठ्यामध्ये पाणी उपलब्ध होत आहे. इतर पाणवठ्यांवर टँकरद्वारा नियमीत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बोर अभयारण्यामध्ये जंगल क्षेत्रातच वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती थांबल्याचे वनविभाग सांगत आहे. बोर अभयारण्यातील दुर्मिळ प्रजातीच्या वन्यप्राण्यांसोबतच पशू व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे व आर.पी. गायनेर तसेच वनरक्षक व वन कर्मचारी प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)