श्रावणबाळ योजनेची २८४ प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: June 2, 2014 01:38 IST2014-06-02T01:38:35+5:302014-06-02T01:38:35+5:30
येथील तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजनेची तसेच संजय गांधी

श्रावणबाळ योजनेची २८४ प्रकरणे प्रलंबित
कारंजा (घाडगे) : येथील तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजनेची तसेच संजय गांधी निराधार योजनेची शेकडो प्रकरणे शासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित आहेत. यामुळे लाभार्थ्यांंना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमात बसत नसतील ती प्रकरणे बाजूला काढून वाजवी प्रकरणे मंजूर करण्याचे औदार्य संबंधीत अधिकारी दाखवायला तयार नाहीत. त्यामुळे वृद्ध आणि आधार नसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. मंजुरीसाठी तहसील कार्यालयाचे दरवाजे झिजवून कंबरडे मोडकळीस आले आहेत. सतत दोन वर्षांपासून श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची सभा कधीही नियमीत झालेली नाही. अशातही कमिटीने प्रकरणे मंजूर केली तरी तत्कालीन नायब तहसीलदारांनी अधिकार वापरून अगदी जुजबी कारणासाठी मंजुरी नाकारली. परिणामी साडेतिनशेच्या असापास श्रावणबाळ व दोनशेच्या आसपास संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता उपविभागीय अधिकार्यांनी नायब तहसीलदार राठोड यांना प्रकरणे त्वरीत मंजूर करण्याचे आदेश दिले. २२ जानेवारी २0१४ ला समितीची विशेष सभा घेवून श्रावण बाळ योजनेची २0 तर संजय गांधी योजनेची ४0 प्रकरणे मंजूर करण्यात आली. उरलेल्या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्यामुळे त्या पूर्ण करण्याचे लाभार्थ्यांंना सांगण्यात आले. आज स्थितीला श्रावण बाळ योजनेची २८४ तर संजय गांधी योजनेची अनेक प्रकरणे मंजुरीकरिता प्रलंबीत आहेत. या विभागात नायब तहसीलदार खिराळे काम सांभाळत आहे. मदतीला एक लिपीक आहे, चपराशी नाही. प्रकरणाची वाढती संख्या आणि इतर प्रशासकीय कामांमुळे प्रकरण मंजुरीस वेळ लागत आहे. दर तीन महिन्याला समितीची बैठक घेवून प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे.(तालुका प्रतिनिधी)