‘नो व्हेईकल डे’साठी २७ सामाजिक संघटना सज्ज
By Admin | Updated: December 19, 2015 01:57 IST2015-12-19T01:57:35+5:302015-12-19T01:57:35+5:30
वर्धा : मी वर्धेकर...आम्ही वर्धेकर...आम्ही सगळे वर्धेकर... ही भावना आता वर्धेतील सर्व स्तरातील जनतेतून व्यक्त होत आहे.

‘नो व्हेईकल डे’साठी २७ सामाजिक संघटना सज्ज
लोकजागर : तयारीला कमालीचा वेग, वर्धेकरांकडून मोहिमेला चळवळीचे स्वरुप
वर्धा : मी वर्धेकर...आम्ही वर्धेकर...आम्ही सगळे वर्धेकर... ही भावना आता वर्धेतील सर्व स्तरातील जनतेतून व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह २७ सामाजिक व सरकारी कर्मचारी संघटना सज्ज झाल्या आहेत. ‘नो व्हेईकल डे’ हा दिवस वर्धेकरांसाठी ‘हेल्थ डे’ ठरविण्याच्या दिशेने वर्धेकरांकडून सक्रिय पुढाकार घेतला जात असल्यामुळे ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘इनिशिएटिव्ह’ला व्यापक स्वरुप येत आहे.
नागरिक व पालकांसह काही महाविद्यालयीन तरुणांनीही ‘लोकमत’ला दूरध्वनी करून या उपक्रमात सहभागी होऊन वर्धेकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आठवड्यातला एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळण्याची ग्वाही दिली.
आम्ही वर्धेकर आणि वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकारातून येत्या रविवारी (दि.२०डिसेंबर) दुपारी ४ वाजता हुतात्मा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित बैठकीत हा दिवस निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याची तयारी या संघटनांच्या प्रतिनिधींनी दर्शविली आहे. या बैठकीमध्ये आठवड्यातल्या नेमक्या कोणत्या दिवशी ‘नो व्हेईकल डे’ पाळावा, यावर विचार मंथन होणार आहे. या बैठकीची तयारी म्हणून काही संघटनांनी आपापल्या सदस्यांची बैठकाही बोलाविल्याची माहिती संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सकारात्मक घडामोडी या वर्धेकरांच्या आगळ्यावेगळ्या चळवळीचे स्वरुप प्राप्त करून देण्याऱ्या ठरत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)