६१० कुटुंबांना २.६७ कोटींची भरपाई
By Admin | Updated: April 27, 2017 00:45 IST2017-04-27T00:45:26+5:302017-04-27T00:45:26+5:30
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात डेल्टा शेडमध्ये ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री स्फोट झाला होता.

६१० कुटुंबांना २.६७ कोटींची भरपाई
दारूगोळा भांडारातील स्फोट : आरटीजीएसद्वारे रक्कम खात्यात वळती
वर्धा : पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात डेल्टा शेडमध्ये ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री स्फोट झाला होता. यात १९ जवान शहीद तर १७ जवान जखमी झाले होते. तीन गावांतील घरांचेही नुकसान झाले होते. स्फोटात नुकसान झालेल्या ६१० कुटुंबांना २.६७ कोटी रुपये भरपाई देण्यात आली. बुधवारी आगरगाव व पिपरीच्या कुटुंबांना आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आले.
पुलगाव येथील स्फोटामध्ये आगरगाव येथील ४५३ घरांचे नुकसान झाले. त्यांना १९ लाख ७२ हजार ४०० रुपये देण्यात आले. पिपरी येथील ९९ घरांचे नुकसान झाले होते. यात त्यांना ४ लाख ९० हजार ८०० रुपये तर नागझरी येथील ५८ कुटुंबांना २ लाख १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात आली. ही मदत आरटीजीएसद्वारे देण्यात आल्याची माहितीही आ. कांबळे यांनी याप्रसंगी दिली.
समन्वय समिती स्थापन करणार
वर्धा : केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना आपल्या शेतात विहीर वा बोरवेल करण्याकरिता दारूगोळा भांडारातर्फे अटकाव केला जातो. कधी-कधी त्यांना मारहाण केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी बुधवारी आ. कांबळे यांच्याकडे केल्या. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत जिल्हा प्रशासन आणि दारूगोळा भांडार प्रशासनात समन्वय साधण्याच्या दृष्टिने समन्वय समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांना देण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)