नांदपूरच्या कॅफेटरियामध्ये पशुचाऱ्यांच्या २४ प्रजाती

By Admin | Updated: August 27, 2015 02:23 IST2015-08-27T02:23:09+5:302015-08-27T02:23:09+5:30

वर्षभर जनावरांसाठी चारा आणायचा कुठून, असा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना भेडसावत असतो.

24 species of maidens in cafeteria of Nandpur | नांदपूरच्या कॅफेटरियामध्ये पशुचाऱ्यांच्या २४ प्रजाती

नांदपूरच्या कॅफेटरियामध्ये पशुचाऱ्यांच्या २४ प्रजाती

पशुपालकांना आधार : पशुवैद्यकीय दवाखान्यात साकारला राज्यातील पहिला फॉडर कॅफेटरिया
वर्धा : वर्षभर जनावरांसाठी चारा आणायचा कुठून, असा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना भेडसावत असतो. चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या दुधाळ जनावरांच्या योग्य संवर्धनासाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी जिल्ह्यातील नांदपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात २४ प्रकारच्या पशुचाऱ्याची लागवड करण्यात आली आहे.
‘फॉडर कॅफेटरिया’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध चाऱ्यांचे प्रकार उपलब्ध झाले आहेत. गरजेनुसार शेतकरी येथून शेतात लागवडीसाठी चारा घेऊन जाऊ शकतात. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून जनावरांच्या संगोपनाला यामुळे चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. सतीश राजू यांच्या संकल्पनेतून हा कॅफेटारिया साकार झाला आहे. जनावरांचे संगोपन करताना चाऱ्याचा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना भेडसावत असतो. योग्य चारा मिळत नसल्याने जनावरांच्या आरोग्यासोबतच दूध उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. यामुळेच देशाच्या विविध भागात पशु आहारासाठी वापरण्यात येत असलेल्या गवताच्या प्रजातीचा अभ्यास करून २४ प्रकारच्या हिरव्या चाऱ्याच्या प्रजाती संकलित करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी चाऱ्याच्या विविध प्रजाती प्रत्यक्ष बघता याव्यात तसेच लागवडीयोग्य क्षेत्रात चाऱ्याची निर्मिती करून पशुधन पाळता यावे, यासाठी चाऱ्याचे बियाणे पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकरी साधारणत: मका, कडबा, बर्लिम, लसून याचप्रकारे पौष्टिक गवत चारा म्हणून वापरतात. हे केवळ विशिष्ट काळातच उपलब्ध होते. टंचाई परिस्थितीत तसेच उन्हाळ्यात पशुपालकांना चाऱ्यासाठी कसरत करावी लागते. नांदपूर येथे पशुवैद्यकीय २४ प्रकारच्या चाऱ्याच्या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. यासाठी झाशी येथील ‘इंडियन ग्रास लॅन्ड अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिट्यूट हैदराबाद’ येथील ‘रिजनल स्टेशन फॉर फॉडर डेमॉन्स्ट्रेशन अ‍ॅण्ड प्रपोगेशन’ तसेच पुण्याच्या ‘बायफ’ संस्थेसह देशातील इतर भागातूनही चाऱ्याच्या प्रजाती संकलित करण्यात आल्या आहेत. यासाठी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. सतीश राजू, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिरूद्ध पाठक तसेच त्यांचे सहायक जाने, महेबूब शेख यांनी ही प्रयोगशाळा यशस्वीपणे सुरू केली. जनावरांसाठी बाराही महिने चारा उपलब्ध करून देण्याचा वर्धा येथील हा राज्यात बहुदा पहिलाच प्रयोग आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 24 species of maidens in cafeteria of Nandpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.