दयालनगरात २४ लाखांची घरफोडी

By Admin | Updated: November 28, 2015 03:03 IST2015-11-28T03:03:41+5:302015-11-28T03:03:41+5:30

घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दयाल नगर परिसरातील हिराणी यांच्या घरी घडली.

24 lakhs burglar in Dayalagarh | दयालनगरात २४ लाखांची घरफोडी

दयालनगरात २४ लाखांची घरफोडी

रोख व सोन्याचे दागिने लंपास : बंद घरातून पळविला ऐवज
वर्धा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दयाल नगर परिसरातील हिराणी यांच्या घरी घडली. या घटनेत चोरट्याने घरातून १८ लाख रुपयांची रोकड व ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २४ लाख रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वर्धा-देवळी मार्गावरील दयालनगर भागात धर्मदास व प्रेमचंद हिराणी हे दोन भाऊ एकाच इमारतीत राहतात. नुकतेच त्यांनी घराला नवीन रूप देण्यासाठी काम सुरू केले. सध्या त्यांच्या घरातील फर्निचरचे काम सुरू आहे. मुलीचे लग्न असल्याने हिराणी कुटुंबीय बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून जळगाव येथे गेले. आलीशान असलेला बंगला कुलूपबंद अन् परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराला मधोमध असलेले कुलूप सोबत आणलेल्या साहित्याने तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी तळ मजल्यातील शयनकक्षात प्रवेश करीत लाकडी आलमारीचे कुलूप तोडून साहित्यांची फेकफाक केली आणि आलमारीतील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पहिल्या मजल्यावरील शयनकक्षात प्रवेश करून तेथीलही लाकडी आलमारीतील साहित्याची फेकफाक करून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरला. शुक्रवारी सकाळी हिराणी कुटुंबीय घरी परतले असता सदर घटना घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.
माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे हे देखील चमुसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची निरखून पाहणी केली. पोलिसांच्या प्रथम पाहणी दरम्यान दीड लाखांची रोकड व काही सोन्याचे दागिने घटनास्थळीच दिसून आले.
घटनास्थळी पोलिसांना देण्यात आलेली चोरीच्या साहित्याची माहिती व तक्रार करतेवेळी फिर्यादीकडून तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या माहितीत तफावत आल्याने शहर पोलिसांनी तक्रारकर्त्यांकडून पुन्हा तक्रार लिहून घेतली. यात या घरातून रोख १८ लाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २४ लाखाचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४७० आणि ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 24 lakhs burglar in Dayalagarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.