निर्णयाचे २४ तास
By Admin | Updated: May 15, 2014 01:46 IST2014-05-15T01:46:50+5:302014-05-15T01:46:50+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास शिल्लक आहेत. कोण असेल नवीन खासदार! काँग्रेस आघाडीचे सागर मेघे की महायुतीचे रामदास तडस..?

निर्णयाचे २४ तास
उत्सुकता शिगेला : नवे खासदार सागर मेघे की रामदास तडस ?
वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास शिल्लक आहेत. कोण असेल नवीन खासदार! काँग्रेस आघाडीचे सागर मेघे की महायुतीचे रामदास तडस..? अशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर निकाल तब्बल महिनाभराने लागणार असल्याने उत्सुकता चांगलीच ताणली गेली. आता अवघ्या २४ तासांनी मतमोजणीला सुरुवात होणार असून नागरिक आतुरतेने वाट बघत आहेत. १५ लाख ६२ हजार ७१२ पैकी १0 लाख १२ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २00९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ लाख ६८ हजार ४१४ मतदारांनी मतदान केले होते. यावेळी तुलनेत तब्बल २ लाख ४३ हजार ७७८ मते अधिक झाली. ही मते कुणाच्या पथ्यावर पडतील, यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. २00९ मध्ये विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी ३ लाख ५२ हजारांवर मते घेत ९५ हजारांवर मताधिक्याने विजयश्री खेचून आणला होती. या निवडणुकीत काँग्रेसचे सागर मेघे यांच्या पारड्यात ही मते पडतील? बसपा उमेदवार चेतन पेंदाम २00९ मधील बसपाची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यात यशस्वी होईल? आम आदमी पार्टीचे अलिम पटेल किती मते घेतील, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार किशोर किनकर कुणाची मते खातील? मोदी फॅक्टरमुळे रामदास तडस चमत्कार घडवतील? हे प्रश्न नागरिक, राजकीय समीक्षकांच्या डोक्यात रुंझी घालत आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्धा लोकसभा मतदार संघातील चित्र मतदारांच्या डोळ्यापुढे होते. काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचे पारडे इतर उमेदवारांपेक्षा जड वाटत होते; पण जसजशी मतदानाची तारीख जवळ येत होती, तसतशी मोदी लहर वाढत होती. अखेरच्या दोन दिवसांत सर्वत्र मोदी लहर असल्याचे बोलले जात होते. मतदानानंतर सागर मेघे व रामदास तडस यांच्यात काट्याची टक्कर होईल, अशी भाकिते वर्तविणे सुरु झाले. यातही जो कुणी विजयी होईल, त्यांच्या मतांमध्ये १0 ते १५ हजार मतांचाच फरक असेल, या अनुषंगानेही आकडेमोड केली जात आहे. यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्राचा नवीन खासदार सागर मेघे वा रामदास तडस, हे सांगणे अवघड होऊन बसले. निवडणूक निकालांतीच हे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)