नऊ महिन्यांत २,३०७ गर्भपात

By Admin | Updated: January 17, 2016 01:54 IST2016-01-17T01:54:24+5:302016-01-17T01:54:24+5:30

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा....

2,307 miscarriages in nine months | नऊ महिन्यांत २,३०७ गर्भपात

नऊ महिन्यांत २,३०७ गर्भपात

जिल्ह्यात अनधिकृत व्यवसायाचा संशय
एकूण ३० खासगी डॉक्टरांना कायद्यानुसार परवानगी
रूपेश खैरी वर्धा
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा संशय गुरुवारी रामनगर येथे उघड्यावर सापडलेल्या मृत अर्भकामुळे बळावला आहे. शिवाय हा प्रकार अनधिकृतच असल्याचा सूर आरोग्य विभागानेही काढला आहे. शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २ हजार ३०७ गर्भपात अधिकृतरित्या झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद असून हा आकडाही धक्कादायक असाच आहे.
जिल्ह्यात झालेल्या या गर्भपाताची सरासरी काढल्यास महिन्याकाठी जिल्ह्यात २५७ गर्भपात होत असल्याचे निष्पन्न होते. यामागे नेमके कारण काय, ही बाब संशय दाट करणारी आहे. यातील सर्वाधिक आकडा खासगी रुग्णालयातील आहे. जिल्ह्यात ३० खासगी रुग्णालयांना गर्भपात करण्याची परवानगी आहे. कायद्याचे पालन करण्याची सक्ती आहे. गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकारातून कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे कितपत सुरू आहे, ही बाब प्रश्नांकित करणारी आहे. खासगी रुग्णालयात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत एकूण १ हजार ९४१ गर्भपात झाले, तर पाचही शासकीय रुग्णालयात एकूण ३६६ गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही नोंद शासनाच्या नियमानुसार आल्याचे दर्शविण्यात आले आहे. गर्भपातानंतर अर्भकाच्या विल्हेवाटीसाठीही शास्त्रीय पद्धत आहे. मात्र ही पद्धत पाळली जाते वा नाही, ही बाब रामनगर परिसरात उकिरड्यावर कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या अर्भकावरुन विचारात घेण्यासारखे आहे. गर्भपातासंदर्भात कायदा कठोर करण्यात आला तरी तो सोईनुसार वळविल्या जात असल्याची चर्चा आहे. केवळ नियम म्हणून त्याची नोंद करीत जिल्ह्यात गर्भपाताचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे नाकारता येत आहे. याच नियमांच्या आधारे असे किती अनधिकृत गर्भपात झाले असतील हे सांगणे कठीण आहे. विभागाने सर्व बाबींसह संबंधित महिलेची प्रत्यक्ष माहिती घेतल्यास वास्तव लक्षात येईल.

नियमानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी
शासनाने कायदा कठोर केला तरी खरच गर्भपाताची गरज असलेल्यांकरिता त्यात मुभा दिली आहे. ही मुभा देताना मात्र काही अटी लादल्या आहेत. या अटींनुसार २० आठवड्यांच्या गर्भवतीला कायद्यानुसार गर्भपात करण्याची परवानागी आहे. या कालावधीनंतर गर्भपात करण्याकरिता महिलेला विशेष समितीची परवानगी घ्यावी लागते. या समितीकडून बलात्कार, कुमारी माता किंवा गर्भात वाढत असलेल्या अर्भकाला काही अपंगत्त्व आल्यास महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यात येते. रामनगर येथे आढळलेले अर्भक साडेआठ महिन्याचे असल्याचे सांगण्यात आले. त्याची नोंद येथे झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून वर्धेत अनधिकृत गर्भपात होत असल्याला दुजोरा मिळत आहे.

Web Title: 2,307 miscarriages in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.