घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत
By Admin | Updated: February 20, 2017 01:15 IST2017-02-20T01:15:09+5:302017-02-20T01:15:09+5:30
पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे.

घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत
करवसुली मोहिमेत ४१ ग्रा.पं. सहभागी : गटविकास अधिकाऱ्यांचाही पुढाकार
आष्टी (शहीद) : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे. यात जागेच्या क्षेत्रफळानुसार घर कर व वापरानुसार पाणी कर आकारला जातो. या करापोटी तालुक्यात २२ लाख रुपये थकित आहेत. मार्च अखेरपर्यंत वसुली व्हावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी ४१ ग्रामपंचायतींना पत्र देत त्वरित कराची वसुली करा, असे निर्देश दिलेत. थकित कर वसुली झाल्यास प्रलंबित समस्यांवर खर्च करता येणार आहे. यामुळे सर्व ग्रामसेवक करवसुली मोहीम राबवित आहेत.
आष्टी तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. आष्टी नगर पंचायत झाल्याने येथील करवसुली यंत्रणा स्वतंत्र आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कराचा भरणा करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी घरमालकांना वसुलीबाबत नोटीस बजावल्या आहेत. ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामसेवक मिळून वसुलीला फिरतात. काही ठिकाणी वसुली मिळते तर काही ठिकाणी शेतमाल विकायचा आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती नाही, यामुळे नंतर कराचा भरणा करू, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.
ग्रामपंचायतकडून सार्वजनिक नाल्या उपसणे, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे, लाईट बसविणे या प्रमुख कामांसह देखभाल दुरूस्तीसाठी प्रयत्न होताना दिसून येतात. पाणीपट्टी वसूल करून विजेच्या बिलाचा भरणा करावा लागतो. कराची वसुली कमी झाली वा झालीच नाही तर बिल कसे भरावे, असा प्रश्न ग्रामसेवकांसमोर उभा ठाकला आहे. सततचा तणाव, नागरिकांच्या तक्रारी यातून कधी मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते.
शासनाने ग्रामपंचायतला अधिकचे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे ग्रामविकास हे उदीष्ट समोर ठेवून सर्वंकष विकासावर भर देणे सुरू केले आहे. आष्टी तालुक्यातील कर मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पंचायत स्तरावर वारंवार आढावा घेतला जात आहे.
२०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन्ही वर्षांची वसुली ६० टक्के झाली आहे. उर्वरित ४० टक्के वसुलीमधील २५ टक्के वसुली मार्च अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींनी वरचेवर कराचा भरणा केल्याचे दिसून येते. विविध प्रमाणपत्र देण्यापूर्वी करवसुली केली काय, ही अट असल्याने वसुलीस हातभार लागत असल्याचे दिसते. तालुक्यातील साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, तळेगाव, या मोठ्या गावांसह सर्व गावांत करवसुली मोहीम धडाक्याने सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामविकासाला चालना देण्याचे प्रयत्न
शासनाकडून गामपंचायत प्रशासनाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामविकासाला चालना मिळावी, हा या मागील हेतू आहे. आता हा हेतू साध्य करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांना झटावे लागणार आहे. ग्रा.पं. ला मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास साधावा लागतो. यामुळे सध्या तालुक्यात घर आणि पाणी कर वसुलीवर भर दिला जात आहे.
गावातील समस्या सोडविण्यासाठी करवसुली पूर्ण झाल्यास हातभार लागेल. नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी घरोघरी भेटी देवून कर वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले आहे.
- ए.बी. मरबड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).