२२ कोविड बाधितांवर होतोय उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:17+5:30

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत.

22 Kovid victims are being treated | २२ कोविड बाधितांवर होतोय उपचार

२२ कोविड बाधितांवर होतोय उपचार

ठळक मुद्देजिल्ह्याची रुग्ण संख्या २८ : सावंगीत १५ तर सेवाग्रामच्या रुग्णालयात सात कोरोना रुग्ण

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाने रविवारी दोन कोरोना बाधितांची नोंद घेतली असली तरी त्यापैकी एक व्यक्ती नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सात तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात १५ असे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकूण २२ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी वर्धा जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित निघाल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या २८ झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी कोरोनाची लागण झालेले १९ व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चार व्यक्तींपैकी तीन व्यक्ती हे वर्धा जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांमध्ये अकोला जिल्ह्यातील पाच, वाशीम एक, औरंगाबाद तीन, मुंबई चार, ओडिशा एक, अमरावती चार, गोरखपूर (उ.प्र.) एक, नागपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण २८ कोरोना रुग्णांपैकी केवळ एकाचाच मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग पुरुषांना सर्वाधिक
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद घेतली आहे. यात १९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असले तरी ३० पुरुषांना आणि १८ महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

चार व्यक्तींचा कोरोनाने घेतला बळी
सध्या २२ व्यक्तींवर जिल्ह्यातील दोन कोविड रुग्णालयात उपचार सुरू असले तरी आतापर्यंत चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या मृतकांमध्ये आर्वी तालुक्याच्या हिवरा (तांडा) येथील महिलेच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.

इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी भ्रमणध्वनीच्या ‘सीडीआर’चा वापर
एखादी कोरोना बाधित रुग्ण जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सहकार्य करीत नसल्यास त्या व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर काढून तो व्यक्ती नेमका कुठे-कुठे फिरला याची इत्यंभूत माहिती आरोग्य विभाग जाणून घेतो. आतापर्यंत काही व्यक्तींच्या मोबाईलचा सीडीआर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने प्राप्त केला असून सदर माहितीबाबत मोठी गुप्तता बाळगली जात आहे.

२२ व्यक्तींची कोरोनाला धोबीपछाड
जिल्हा प्रशासनाने कोविड बाधितांची नोंद घेतलेला आकडा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरील असला तरी आतापर्यंत तब्बल २२ व्यक्तींनी कोरोनाला धोबीपछाड देत त्यावर विजय मिळविला आहे. यात जिल्ह्यासह बाहेरजिल्ह्यातीलही कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

रशियाचे तिघे संस्थात्मक विलगीकरणात
रशियातून जिल्ह्यात परतलेल्या तिघांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. सदर तिघांचीही आरोग्य तपासणी केल्यावर त्यापैकी एकाला यात्री निवास येथे तर दोन व्यक्तींना पार्थ हॉटेल येथे क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.

Web Title: 22 Kovid victims are being treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.