जिल्ह्यात २१ लाख क्विंटल कापसाची आवक
By Admin | Updated: February 8, 2015 23:36 IST2015-02-08T23:36:50+5:302015-02-08T23:36:50+5:30
कधी सुरू कधी बंद अशा स्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी बंद असल्याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. शासकीय व व्यापाऱ्यांची खरेदी

जिल्ह्यात २१ लाख क्विंटल कापसाची आवक
वर्धा : कधी सुरू कधी बंद अशा स्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी बंद असल्याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. शासकीय व व्यापाऱ्यांची खरेदी मिळून शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण २० लाख ७६ हजार ९३९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना एवढा कापूस आला कुठून अशी चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे कापसाचे उत्पन्न कमी होईल, असे बोलले जात असताना कापसाची विक्रमी आवक झाली. कापसाची खरेदी उशिरा सुरू झाल्याने यंदा शेतकऱ्यांची अडचण झाली. शासनाची खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांनी प्रारंभीपासूनच त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकण्याचा सपाटा सुरू केला. यामुळेच की काय शासकीय खरेदीपेक्षा व्यापाऱ्यांची खरेदी अधिक आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी असला तरी त्यांनाच कापूस देण्याचे कारण न उलगडणारे आहे.
हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी सीसीआयला त्यांचा कापूस देण्याचा निर्णय घेतला. सीसीआयच्यावतीने ६ लाख ८३ हजार ७४८ क्विंटल कापसाची खरेदी झाली. दरम्यान सीसीआयच्यावतीने जागेचे कारण काढून खरेदी बंद केली. याचा लाभ व्यापाऱ्यांना झाला. व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडत ३ हजार ६०० रुपयांत कापसाची खरेदी केली. असे असतानाही व्यापाऱ्यांची खरेदी शासकीय खरेदीच्या दुप्पट आहे. व्यापाऱ्यांनी एकूण १३ लाख ९३ हजार १९१ क्विंटल कापसाची खरेदी केली. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)