लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पाची उंची वाढविण्यात आली असून, त्यावर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला की, आपोआप दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होतो. सोमवारी सायंकाळी काही भागात धुवाधार पाऊस झाला. परिणामी या प्रकल्पाची पाणीपातळी वाढून रात्री आपोआप २१ स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. यामुळे धामनदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या गावांत शिरल्याने एकच धावपळ सुरू झाली. गावकऱ्यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली असून, रात्रीच अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये दाखल झाले.
धाम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची १.९ मीटरने वाढविली असून, सांडव्यावर ३४ स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून, सोमवारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या २१ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीला पूर येऊन काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, आंजी (मोठी) या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. काही वेळातच पाणी गावात शिरल्याने मोरांगणा येथील आठ, तर आंजी (मोठी) येथील १५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे घरातील साहित्याची नासाडी झाली.
चार गायी गेल्या वाहूनवाघाडी नदीला पूर आल्यामुळे कारंजा (घाडगे) तालुक्यातील बोरगाव (गॉडी) ते माळेगाव ठेका या मार्गावरील पुलावरून पाणी वाहायला लागले. या पुरामध्ये बोरगाव (गॉडी) येथील चार गायी वाहून गेल्या असून, बाकी जनावरे थोडक्यात बचावली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहत असते. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. पण, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजीचा सूर आहे.
अधिकारी गावात, नागरिकांशी संवादधाम प्रकल्पाचे अधिकारी या पूरपरिस्थितीबाबत अनभिज्ञ असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. गावात पाणी शिरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खरांगणा, मोरांगणा, आंजी, काचनूर, सावद, कासारखेडा या गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, खरांगण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, मंडळ अधिकारी अनिल जगताप, ग्राममहसूल अधिकारी अनिकेत गव्हाळे, अरविंद तायडे, ग्राम महसूल सेवक मनिराम गावंडे, खरांगणा येथील पोलिस पाटील रवींद्र राऊत, मोरांगणा येथील पोलिस पाटील महेंद्र वाघमारे, पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी मदतकार्य केले. आंजी (मोठी) येथे नायब तहसीलदार संदीप दाबेराव, अजय धर्माधिकारी, मंडळ अधिकारी राजू झांबरे, तलाठी मानकर, आदींनी परिस्थितीचा आढावा घेत मदतकार्य केले.
आमदारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पंचनामे करण्याचे निर्देशधाम नदीला पूर आल्याने पाणी गावात शिरून खरांगणा, मोरांगणा, सावद, कासारखेडा व काचनूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार सुमित वानखेडे यांनी या भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी खरांगणा मंडळचे मंडळ अधिकारी जगताप, ग्राम महसूल अधिकारी केळवटकर, मदना येथील अरविंद तायडे, कासारखेड येथील अनिकेत गवाळे, खरांगणा मंडळचे सर्व महसूल सहायक व पोलिस पाटील उपस्थित होते.