पाण्यासाठी २०० गावकरी तहसीलवर धडकले
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30
तालुक्यातील टोना पुनर्वसन या गावातील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे.

पाण्यासाठी २०० गावकरी तहसीलवर धडकले
आर्वी : तालुक्यातील टोना पुनर्वसन या गावातील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी तळमळणाऱ्या २०० गावकऱ्यांनी बुधवारी आर्वी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ठाण मांडले. परंतु नवनियुक्त उपविभागीय अधिकारी अद्याप रुजू न झाल्याने गावकऱ्यांनी समस्येचे निवेदन तहसीलदार मनोहर चव्हाण यांना दिले व तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली.
दरम्यान तहसीलदार यांनी उपविभागीय अभियंता गोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. गुरुवारी दोन्ही अधिकारी गावाला भेट देऊन समस्या निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतरच गावकरी शांत झाले.
आर्वी तालुक्यातील टोना पुनर्वसन गावापासून एक कि.मी. अंतरावर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी हजार रूपये प्रति महिन्याने एका व्यक्तीची नियुक्ती संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली. परंतु हजार रुपये महिना परवडत नसल्याच्या सबबीखाली गेल्या आठ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी पाण्याअभावी गैरसोय होऊ लागली. नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पुनर्वसित गावात कोणत्याही नागरी सुविधा नाही. गावात सांडपाण्याची व्यवस्था नाही, प्रवासी निवारा नाही, ग्रामपंचायत इमारत, जुने गाव ते टोना पुनर्वसन गावाला जोडणारा रस्ता नाही, शेतात वहिवाटीचे रस्ते नसल्याने गावकरी अनेक समस्यांना तोंद देत आहेत.
त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठून मागण्या लावून धरल्या. सध्या सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पाणी समस्या संपूर्ण तालुक्यातच जाणवू लागली आहे. कार्यवाहीच्या आश्वासनंतरच ग्रामस्थांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)