कंटेन्मेंट झोनमधील २०० कुटुंब घरातच ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:37+5:30
कोरोनाने ग्रामीण भागात एन्ट्री केली असून आर्वी येथील सिंधी कॅम्प परिसरात आईसह चिमुकल्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या कार्यवाहीला गती दिली आहे. सिंधी कॅम्प परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला असून परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांची यादी परिसरातील नागरिकांना सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.

कंटेन्मेंट झोनमधील २०० कुटुंब घरातच ‘लॉक’
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : येथील सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने सिंधी कॅम्प परिसर सील करून परिसरातील नागरिकांचे आवागमन थांबविले आहे. कंटेन्मेंट झोनमधील २०० कुटुंबांना लॉकडाऊन करण्यात आले असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
कोरोनाने ग्रामीण भागात एन्ट्री केली असून आर्वी येथील सिंधी कॅम्प परिसरात आईसह चिमुकल्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या कार्यवाहीला गती दिली आहे.
सिंधी कॅम्प परिसर कंटेंन्मेंट झोन जाहीर केला असून परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांची यादी परिसरातील नागरिकांना सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात ४९ युवा सामाजिक कार्यकर्ते तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील १९ सोशल सेवकांची नियुक्ती केली आहे. प्रभाग चार साठी राजेंद्र सुपणार आणि गवारले हे दोन शिक्षक तर प्रभाग तीनसाठी गोंदाणे आणि गौरकार या दोन शिक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून नागरिकांना घरपोच वस्तू व इतर साहित्य दिले जाणार असल्याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली.
गुरुनानक धर्मशाळेत उभारले आरोग्य केंद्र
सिंधी कॅम्प परिसरातील २०० कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने तालुका आरोग्य अधिकारी संगीता झोपाटे यांनी गुरुनानक धर्मशाळेचे सचिव टेकचंद मोटवानी यांच्याशी संपर्क करून धर्मशाळेतील एका हॉल नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी देण्याची विनंती केली. धर्मशाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती देत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गुरुनानक धर्मशाळेत आरोग्य केंद्र उभारण्याची व्यवस्था केली असून पोलीस कर्मचाºयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.