२० शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू

By Admin | Updated: December 22, 2015 03:05 IST2015-12-22T03:05:15+5:302015-12-22T03:05:15+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पद भरतीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात

20 teachers begin hunger strike | २० शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू

२० शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू

वर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पद भरतीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना वैयक्तिक मान्यता मिळण्याकरिता २० शिक्षकांनी जि.प. समोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शासन निर्णयानुसार शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार यापूर्वी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६४ पैकी २० शिक्षण सेवकांना त्रुटी अभावी वैयक्तिक मान्यता मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी त्रुटीची पुर्तता केली. दरम्यान, ६ फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार आॅगस्ट, आॅक्टोबर व डिसेंबर या महिन्यात वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करणे क्रमप्राप्त होते. असे असताना शिक्षण विभागाच्यावतीने वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन जाणीवपुर्वक केले नसल्याचा आरोप करीत उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक तक्रार निवारण समितीच्यावतीने सोमवारपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणात सौरभ वाघ, स्वप्नील सावदे, वैभव अवचट, मनिष झाडे, व्ही.व्ही. जाचक, आर.एम. मुटे, विशाल नावाडे, अपर्णा ना. भगत, आर.एच. पवार, वैशाली सावंत, दिप्ती राऊत, भाग्यश्री येवले, मनिषा कुबडे, एन.आर. मालेवार, अर्पित वाघ, निता ढोणे आदि शिक्षकांचा समावेश आहे.
गत साडे तीन वर्षांपासून २० शिक्षकांना वैयक्तिक मान्यता न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात शिक्षकांनी यापूर्वी जि.प. समोर ठिय्या आंदोलन केले. त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०१५ रोजी तक्रार निवारण समितीच्यावतीने आमरण उपोषणाची सुचना देण्यात आली. संघटनेच्या निवेदनावर शिक्षण विभागातून शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांना मार्गदर्शन मागविले. त्यात सदर प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्या कार्यालयात तपासणी करीत प्रलंबित असल्याचे नमुद केले.
दरम्यान २ मे २०१२ नंतर वैयक्तिक मान्यता दिलेले प्रस्तावच फक्त आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवावयाचे असताना ज्या प्रस्तावांना वैयक्तिक मान्यता दिलीच नाही असे प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) कार्यालयात पाठविण्यात आल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 20 teachers begin hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.