महिनाभरात १८३० रुग्णांची नोंद
By Admin | Updated: August 26, 2014 23:38 IST2014-08-26T23:38:46+5:302014-08-26T23:38:46+5:30
पावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे.

महिनाभरात १८३० रुग्णांची नोंद
वातावरणातील बदल : बळावताहेत श्वसनाचे आजार; रुग्णालयात वाढतेय गर्दी
रूपेश खैरी - वर्धा
पावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे. ही वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गत एक महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या श्वसनाचे आजार जडलेल्या एकूण एक हजार ८३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात एक हजार तीन पुरूष व ७२७ महिलांचा समावेश आहे.
निसर्गाच्या कोपामुळे केवळ शेती वा त्याच्याशी निगडीत असलेल्या घटकावर विपरीत परिणाम होतो असेच नाही तर या कोपाचा परिणाम सर्वांवरच होत असल्याचे रुग्णालयात वाढत असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. या महिनाभरात रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, हगणव, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या तुलनेत श्वसनाचे आजार असलेले रुग्ण अधिक असल्याचे समोर येत आहे. या रुग्णांवर उपचार शक्य आहे; मात्र वाढत असलेले प्रमाण चिंतेचा विषय आहे. वातवारणात सध्या झालेला बदल हेच एक कारण नाही तर याला अनेक कारणे जबाबदार असल्याचे समोर येत आहे.
वातावरणातील बदल हे नैसर्गिक कारण असले तरी वाढते प्रदुषण हे एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. वर्धा शहरात प्रदुषणाचा विचार केल्यास शहरालगत असलेल्या कंपनीकडे बोट दाखविले जाते. यात कंपनीचा वाटा असला तरी रस्त्याने धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. ही वाहने चालविताना त्यातून निघणारा धुर श्वसनाचे आजार वाढवित आहे. रस्त्याने धावणाऱ्या वाहनात आॅटोतून निघणारा धूर नाकावर रूमाल लावण्यास भाग पाडणारा आहे. शिवाय या आॅटोत पेट्रोलसोबत रॉकेलचा वापर होत असल्याने त्यातून निघणारा धूर सर्वसामान्यांना आजारी पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
डायरियाचे २७६ रुग्ण
सध्या असलेल्या वातावरणातील सर्वात घातक रोग म्हणून डायरियाकडे बघितल्या जात आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास प्राण गमविण्याची वेळ येवू शकते. हा आजार सर्वाधिक चिमुकल्यांना होत असल्याने राज्य शासनाने अतिसार पंंधरवडा सुरू केला. यात रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा कालावधी वाढवून दिला. या कालावधीत जागृती करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असले तरी त्याचा विशेष लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराच्या २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. यात १४७ पुरूष व १२९ महिला रुग्णांचा समावेश आहे. शिवाय शासनाच्यावतीने रुग्णांना घरी जावूनही औषधोपचार सुरू आहे.