करमणूक करातून १.८३ कोटींची कमाई

By Admin | Updated: April 4, 2017 01:15 IST2017-04-04T01:15:03+5:302017-04-04T01:15:03+5:30

जिल्ह्यात एकही सांस्कृतिक सभागृह नाही, मोठे सिनेमागृह नाही तरीही जिल्हा करमणूक कर भरण्यात जिल्हा आघाडीवर असलेल्याचे दिसून आले आहे.

1.83 crores earned from entertainment tax | करमणूक करातून १.८३ कोटींची कमाई

करमणूक करातून १.८३ कोटींची कमाई

दोनच मोठ्या कार्यक्रमांची नोंद
महेश सायखेडे वर्धा
जिल्ह्यात एकही सांस्कृतिक सभागृह नाही, मोठे सिनेमागृह नाही तरीही जिल्हा करमणूक कर भरण्यात जिल्हा आघाडीवर असलेल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या करमणुकींच्या साधनांतून मिळणाऱ्या कराच्या उद्दिष्टापैकी ८० टक्के म्हणजेच १ काटी ८३ लाख ६९ हजार रुपयांची वसुली केल्याची माहिती आहे. ही वसुली जिल्ह्यात कुठलीही विशेष करमणूक सुविधा नसताना झालेली जिल्ह्याची खरी कमाई ठरत आहे.
उर्वरीत २० टक्के वसुली करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाचे अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन महसूल, गौणखनिज व करमणूक करातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यात करमणूक कराचा मोठा वाटा असल्याचे या वसुलीवरून दिसून आले आहे. चित्रपटगृह, गेम पार्लर, आयोजित करण्यात येणारे मोठे उत्सव व केबल एजन्सी धारक यांच्याकडून करमणूक कर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वसुल केल्या जातो.
जिल्ह्यात २४७ अधिकृत केबल एजन्सी धारक आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरी सेटटॉपबॉक्स देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच त्याचा कर वसुल केल्या जात आहे. तर १८ गेम पार्लर आहे. त्यांच्याकडून या विभागाच्यावतीने कराची वसुली होत असल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त सात चित्रपटगृह असल्याची नोंद आहे. यातील दोन टुरींग चित्रपटगृह असल्याचे सांगण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात कला महोत्सव व रोटरी फेस्टीवल हे मोठे कार्यक्रम झाल्याची नोंद आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्याला २३० लाखांचा करमणूक कर वसुलीवे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ८३ लाख ६९ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. त्याची सरासरी ८० टक्के असून करमणूक कराचा भरणा न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

२०१५ मध्ये ११० टक्के वसुली
आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये जिल्ह्याला १.७५ कोटी, २०१४-१५ मध्ये १.९५ कोटी, २०१५-१६ मध्ये २ कोटी तर २०१६-१७ मध्ये २.३० कोटींचे उद्दिष्ट होते. २०१३-१४ मध्ये १.७४ कोटी ९१.१८ टक्के, २०१४-१५ मध्ये २.४७ कोटी ११० टक्के, २०१५-१६ मध्ये २.१९ कोटी १०९.८० टक्के तर २०१६-१७ मध्ये १.८३ कोटी ८० टक्के करमणूक कर वसूल झाला. थकित २० टक्के कर वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा करमणूक कर विभाग प्रयत्नशील आहे.
अन्यथा दंडात्मक कारवाई
थकित करमणूक कर ३१ मार्चपर्यंत भरण्याबाबत थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ सुधारणा २०१५ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे करमणूक विभागाने सांगितले.
यंदा वर्धा तालुक्याला १.४२ कोटी, सेलू १३.५० लाख, देवळी १२.५ लाख, हिंगणघाट ३८ लाख, समुद्रपूर ४.२५ लाख, आर्वी १४.५० लाख, आष्टी (श.) ३.२५ लाख, कारंजा (घा) तालुक्याला १९.७५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी १७ मार्चपर्यंत वर्धा ८०.०३ लाख, सेलू ९.०१ लाख, देवळी १०.५० लाख, हिंगणघाट २७.८६ लाख, समुद्रपूर ३.८४ लाख, आर्वी ९.५३ लाख, आष्टी (श.) ३.२९ लाख तर कारंजा (घा) तालुक्याने ७६ हजारांच्या करमणूक कराची वसुली केली आहे.

Web Title: 1.83 crores earned from entertainment tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.