सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत झाली १,७५० स्वॅबची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:38+5:30
भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने कोरोना चाचणीसाठी परवानगी दिल्यानंतर ४ मे पासून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला वर्धा जिल्ह्यासह अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यातून आलेले स्वॅबही तपासण्यात आले; पण सध्या केवळ वर्धा जिल्ह्यातील स्वॅब तपासले जात आहेत.

सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत झाली १,७५० स्वॅबची तपासणी
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोविड-१९ या विषाणूच्या चाचणीची परवानगी मिळाली. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने परवानगी मिळाल्यानंतर सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत ४ मे पासून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत सेवाग्रामच्या या प्रयोगशाळेने तब्बल १ हजार ७५० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी केली आहे.
भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने कोरोना चाचणीसाठी परवानगी दिल्यानंतर ४ मे पासून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला वर्धा जिल्ह्यासह अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यातून आलेले स्वॅबही तपासण्यात आले; पण सध्या केवळ वर्धा जिल्ह्यातील स्वॅब तपासले जात आहेत. रात्री उशीरापर्यंत सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचणीचे काम सुरू राहत असून लवकरच स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. शिवाय त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी टेस्टींगची क्षमता वाढविण्यासाठी या प्रयोगशाळेला परवानगी दिली आहे.
३३ स्वॅबवर केला ‘पॉझिटिव्ह’चा शिक्कामोर्तब
सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत आतापर्यंत १ हजार ७५० स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यापैकी ३३ व्यक्तींचे स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह असल्याची खात्री सदर प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी करून दिली आहे. तर सहा व्यक्तींचे स्वॅब इनकनक्यूसिव्ह आणि उर्वरित व्यक्तींना कोरोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत दिला आहे.
१३ तज्ज्ञ करतात रात्री उशीरापर्यंत काम
सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत आलेल्या प्रत्येक स्वॅबची तपासणी दक्ष राहून तेथील तज्ज्ञांकडून केली जात आहे. सध्यास्थितीत सुमारे १३ तज्ज्ञ प्राप्त झालेल्या स्वॅबची तपासणी रात्री उशीरापर्यंत करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी
वर्धा जिल्ह्यात कासवगतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे टेस्टींगलाही गती देत स्वॅब तपासणीच्या क्षमतेत वाढ करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला देण्यात आली आहे.
विविध साहित्याची प्रतीक्षा
कोविड चाचणीची क्षमता वाढविण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न होत असले तरी आवश्यक असलेले विविध साहित्य अद्यापही सेवाग्रामच्या प्रयोगशाळेला प्राप्त झालेले नाही. हे साहित्य येत्या काही दिवसात प्राप्त होईल अशी अपेक्षा महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला असून त्यानंतर या प्रयोगशाळेची कोविड चाचणीची क्षमता दुप्पट किंवा तिप्पटच होणार आहे.
एका दिवशी १२० स्वॅब तपासणीचा विक्रम
मागील २५ दिवसांमध्ये सेवाग्राम येथील प्रयोग शाळेत एकूण १ हजार ७५० स्वॅब तपासण्यात आले असले तरी एकाच दिवशी तब्बल १७० स्वॅबची तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.
महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोविड चाचणीची परवानगी मिळाल्यापासून १,७५० स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी टेस्टिंग कॅपिसीटी वाढविण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु, आवश्यक असलेले विविध साहित्य सध्या आम्हाला प्राप्त झालेले नाही. सदर साहित्य प्राप्त झाल्यावर टेस्टिंगची कॅपिसिटी दुप्पट किंवा तिप्पट होईल.
- डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम.