वर्धा : नाशिक येथे कुंभमेळा आयोजित आहे. या मेळाव्यात देशभरातून भाविक येत आहेत. यामुळे पोलिसांवर ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन येथून गृहरक्षक पाठविण्यात येत आहे. वर्धेतील १७५ गृहरक्षक नाशिक येथे सेवा देणार आहेत.जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात केंद्र नायक सिद्धार्थ नगराळे व प्रभारी समादेशक अधिकारी सुरेश दुधे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातून १५० पुरूष होमगार्ड व २५ महिला होमगार्ड बुधवारी रवाना झाले आहेत. राज्याच्या ३१ जिल्ह्यातून या बंदोबस्तासाठी होमगार्डची मागणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वर्धा जिल्हा होमगार्डची वर्णी लागली आहे. १२ वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी सुरेश दुधे यांच्या नेतृत्वात वर्धा येथून होमगार्ड गेले होते. त्यावेळी नाशिक ग्रामीण म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे वर्धेच्या होमगार्डची कामगिरी उल्लेखनिय ठरली होती. यावेळी वर्धा पथकाचे ८० पुरूष व २५ महिला, हिंगणघाट पथकाचे ३५ पुरूष व आर्वी पथकाचे ३५ पुरूष असे एकूण १७५ गृहरक्षकांची निवड करण्यात आली. त्यांना नाशिक येथे जाण्याकरिता नाशिक पोलीस प्रशासनाने बसेसची व्यवस्था केली. बंदोबस्तासाठी देवेश खुळे, चंद्रकांत हिवरे, कुुंभारे, संतोष जैस्वाल, दिपेश जवादे, कळमखेडे, अशोक कोकाटे, वसंत सातपुते, राम निवलकर, चंद्रशेखर, शेलकर, चेतन सातपुते, नामदेव खाणझोडे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
१७५ गृहरक्षक देणार कुंभमेळ्यात सेवा
By admin | Updated: August 21, 2015 02:34 IST