‘मूव्ह बाय लव्ह’करिता १७ हजार किमीचा प्रवास
By Admin | Updated: August 26, 2014 23:39 IST2014-08-26T23:39:57+5:302014-08-26T23:39:57+5:30
‘मूव्ह बाय लव’ हे घोषवाक्य घेऊन भारतात प्रेम, मैत्री आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी भारत भ्रमणावर निघालेली ३८ वर्षीय शीतल निरथ वैद्य रविवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.

‘मूव्ह बाय लव्ह’करिता १७ हजार किमीचा प्रवास
विनोबांच्या पुस्तकातून मिळाली प्रेरणा : संदेश यात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल
दिलीप चव्हाण - सेवाग्राम
‘मूव्ह बाय लव’ हे घोषवाक्य घेऊन भारतात प्रेम, मैत्री आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी भारत भ्रमणावर निघालेली ३८ वर्षीय शीतल निरथ वैद्य रविवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. कच्छ येथील लखपत या गावातून सुरू झालेली तिची ही यात्रा १७ हजार किमीचा प्रवास करून आश्रमात पोहोचली.
शीतल निरथ वैद्य ही पती निरथ त्रिवेदी यांच्यासह पुण्याला वास्तव्यास आहे. त्यांचे ‘लाईफ स्कील ट्रेनिंग’चे कार्य सुरू आहे. अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून ‘मानव साधना’ संस्थेचे समाजातील तळागळातील लोकांसाठी कार्य सुरू आहे. आज ‘मैत्री’ हा शब्द परवलीचा बनला आहे. कुणीही कुणाशी कामापुरतेच संबंध ठेवत आहेत. सर्वत्र संबंध हे व्यवहाराधीन झाल्याचे दिसते; पण कितीही झाले तरी आपण मानव आहो. मैत्रीतून, प्रेमातून आपण जगाला एकसुत्रात बांधू शकतो. शत्रूत्व मिटवू शकतो. समविचारी लोक आणि सेवा करण्याची भावना बाळगणारे आम्ही सर्व एकत्र आलो आणि यात्रेची सुरुवात झाली.
घोषवाक्याबाबत त्यांनी सांगितले, संत विनोबा भावे लिखीत ‘मूव्ह बाय लव’ पुस्तक आहे. यात त्यांचे अनुभव असून हे शिर्षक योग्य वाटले. आमच्या संघटनेची महिना दीड महिन्यातून साबरमती आश्रमात देशभरातील विचारांना जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक होते. चर्चा, मंथन, कार्य याचा आढावा घेतला जातो. प्रत्येक व्यक्ती मैत्रीचा धागा जोडण्याचा आणि तो वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, या कामात पैशाची गरज वाटली नाही. गरज आहे ती विश्वास, सहानुभूती व मदतीची! यातूनच वाढते घट्ट मैत्री! गांधीजी, विनोबाजी यांनी पे्रम, मैत्रीतून लोकांना जोडले. एक विचार दिला़ प्रत्यक्ष संबंध, विचारांचे आदान-प्रदान याकडे मात्र आज सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याची खंतही वैद्य यांनी व्यक्त केली.
प्रवासातील सहकारी याबाबत त्या म्हणाल्या की, प्रारंभी एक आठवडा माझे पती आणि एक सहकारी होते. त्यानंतर मी एकटीने प्रवास केला. या विचारावर प्रभावित होऊन गायक कबीर हे देखील प्रवासात राहिले. हा प्रवास माझ्या स्व-खर्चाने केला आहे़ यात्रेचे नियोजन केलेले नाही, संपर्क नाही़ परिवारात राहून मी पूढे-पूढे जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ प्रवासादरम्यान अद्याप कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही़ उलट चांगले सहकार्य मिळत आहे़ एक स्त्री भारत भ्रमण करीत आहे, याचेच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले़ मैत्रीचा हात पुढे करून परतीच्या मार्गाला निघत आहे. २ आॅक्टोबर गांधी जयंती दिनी साबरमती आश्रमात पोहोचणार असल्याचेही यावेळी शीतल वैद्य यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.