१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात
By Admin | Updated: October 13, 2016 01:15 IST2016-10-13T01:15:22+5:302016-10-13T01:15:22+5:30
निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे.

१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात
पुनर्वसनाची व्यथा : महावितरण व प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष
आष्टी (शहीद) : निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे. विद्युत वितरण कंपनीची वीज प्रवाहित लाईनही धरणाच्या पाण्यात बुडाली आहे. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावठाणाच्या सभोवताल १७ जिवंत खांब अद्याप अन्यत्र हलविले नाही. यामुळे धोक्याची शक्यता बळावली आहे.
अहिरवाडा गावाचे ५० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. उर्वरित ग्रामस्थांना शासनाकडून वाढीव मोबदला मिळण्याची आशा आहे. पूर्वी मिळालेली तुटपूंजी रक्कम खर्च झाल्याने आता घराचे बांधकाम करण्यासाठी बाधित कुटुंबांकडे पैसे नाहीत. यामुळे नाईलाजास्तव जुन्याच गावात राहावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या वीज पुरवठ्याचे खांब पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुटुंबांचे शासनाने त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
वीजसेवा ही प्राथमिक गरज आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते; पण जुने वीज पुरवठ्याचे खांब धरणाच्या पाण्यात बुडाले असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या १७ खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खांब पाण्यात असल्याची माहिती वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू, असे म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे.
धरणाच्या पाण्यात गावातील लहान मुले पोहायला जातात. गुरांना पाणी पिण्याकरिता घेऊन जावे लागते. महिला कपडे धुण्यासाठी जातात. अशावेळी पाण्यााध्ये वीज प्रवाह संचारल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. गत कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी बाब असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार करीत पाण्यातील १७ खांबांवरील वीज पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)