शेतकरी आत्महत्यांची १७ प्रकरणे मंजूर

By Admin | Updated: November 22, 2015 02:18 IST2015-11-22T02:18:03+5:302015-11-22T02:18:03+5:30

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली.

17 cases of farmer suicides approved | शेतकरी आत्महत्यांची १७ प्रकरणे मंजूर

शेतकरी आत्महत्यांची १७ प्रकरणे मंजूर

२९ प्रकरणांवर चर्चा : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय
वर्धा : अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये २९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १७ प्रकरणे मदतीस पात्र करण्यात आली. आठ प्रकरणे अपात्र तर तीन प्रकरणे वगळण्यात येऊन एक प्रकरण वर्ग करण्यात आले.
शेतकरी आत्महत्या थांबाव्यात. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने तालुकास्तरावर समाज प्रबोधनाचे विशेष कार्यक्रम राबविण्यात यावेत, असा निर्णय शेतकरी आत्महत्या जिल्हास्तरीय समितीत घेण्यात आला.
समितीच्या बैठकीला आ. समीर कुणावार, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसरंक्षक पगार, अग्रणी बँकचे व्यवस्थापक विजय जांगडा, उपजिल्हा पोलीस अधीक्षक आर.जी. किल्लेकर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्या प्रकरणांसदर्भात प्रकरणे अत्यंत संवेदनशिलपणे हाताळणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्या होऊच नयेत यासाठी तालुकास्तरावर सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊन ते नैराश्यातून बाहेर पडतील, असे मत आ. कुणावार यांनी समितीसमोर मांडले.
तसेच नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांना त्वरीत मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर तत्काळ प्रकरणातील त्रूटींची पूर्तता करून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाची मदत मिळवून द्यावी असेही ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्या होऊ नयेत. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येतो आहे, असे डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितले. त्यांनी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 17 cases of farmer suicides approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.