शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मदतीस पात्र
By Admin | Updated: January 21, 2016 02:01 IST2016-01-21T02:01:50+5:302016-01-21T02:01:50+5:30
शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मदतीस पात्र
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय
वर्धा : शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीत एकूण १९ प्रकरणे समोर ठेवण्यात आली. यातील १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर ४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, पं.स. सभापती कुंदा भोयर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, केम प्रकल्पाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्योबाबतची प्रकरणे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावेत. फेरचौकशीच्या प्रकरणांमध्येही महसूल, पोलीस तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समितीकडे त्वरित सादर करावी. नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अशी प्रकरणे प्राधान्याने पाठवावी, आदी निर्णयही बैठकीत घेण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)