ग्रामपंचायतींच्या १५७ कर्मचाऱ्यांनी केले ‘काम बंद’
By Admin | Updated: November 3, 2014 23:30 IST2014-11-03T23:30:40+5:302014-11-03T23:30:40+5:30
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़

ग्रामपंचायतींच्या १५७ कर्मचाऱ्यांनी केले ‘काम बंद’
आष्टी (श़) : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़ याप्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले़ आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची सभा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले़
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कर्मचारी कार्यरत आहे़ कर्मचारी हा नागरिक व शासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात़ परंतु दिवसागणिक अतिरिक्त कामाचा बोजा वाढत असल्यामुळे दिवसभर काम करावे लागते़ त्यातच नियमित पगार मिळत नाही़ या कारणाने उसनवारीवर वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो. दिवाळीच्या दिवशी घरातील सदस्यांना कपडे घेण्यासाठीदेखील कर्मचाऱ्यांकडे पैसे नसल्याचे वास्तव यंदा पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी ग्रामसेवक दिवसभर हजर राहत नाही़ त्यांचाही अतिरिक्त पदभारही कर्मचाऱ्याना सांभाळावा लागतो. अशा सगळ्या भानगडी असूनही कर्मचारी आपले काम करीत असतात.
शासनाने २०१३ च्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व सुधारित वेतन देणे आवश्यक होते़ परंतु पंचायत समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामसेवकांचे अरेरावी धोरण आडवे आले़ सर्वच ग्रामसेवक शासन आदेशानुसार वेतन द्यायला तयार नसल्याचा आरोप ग्रा़ पं़ कर्मचाऱ्यांनी केला आहे़ १ एप्रिल २०१४ पासून मूळ किमान वेतन लागू करावे, राहणीमान भत्ता द्यावा, सेवाज्येष्ठता यादीत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची मर्यादा २५ टक्क्यावरून ३५ टक्के करावी, २०११ च्या लोकसंख्येनुसार आकृतिबंधात नव्याने सुधारणा करावी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव पारित करावे आदी मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़
ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सन्मानाची वागणूक देत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आंदोलनात केला. यामध्ये युनियनचे अध्यक्ष संजय पाथरे, सचिव रवीन्द्र होले, सहभागी होते. गटविकास अधिकाऱ्यांनी सभा घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)