१४० सावकारी कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर
By Admin | Updated: February 5, 2016 01:46 IST2016-02-05T01:46:02+5:302016-02-05T01:46:02+5:30
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२४ कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

१४० सावकारी कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर
अनेकांचे गहाण सावकाराकडेच : १ कोटी ३७ लाख रुपयांची प्रतीक्षा
वर्धा : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२४ कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ३६ लाख ५१ हजार ८१४ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सावकारी कर्जमाफीचे नव्याने १४० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीद्वारे मंजूर केले आहे. या शेतकऱ्यांना १७ लक्ष ३९ हजार ८१४ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी कळविले आहे.
या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तरी त्यांना त्यांच्या गहाणाबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात पाच कोटी गरज असताना केवळ चार कोटीच रुपये मिळाले आहेत. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. संपूर्ण कर्जमाफीकरिता एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांची गरज आहे. जिल्हास्तरीय समितीच्या सभेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग चुटके, सहाय्यक निबंधक जयंत तलमले, सहाय्यक निबंधक वनस्कर, निनावे, वडे उपस्थित होते. या संदर्भात जिल्ह्यातील काही पात्र शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी लाभ मिळाला नसला त्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.(प्रतिनिधी)