वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त
By Admin | Updated: July 1, 2014 23:37 IST2014-07-01T23:37:06+5:302014-07-01T23:37:06+5:30
ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली़ योग्य रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असते; पण डॉक्टर शासकीय

वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त
रुग्णसेवा कोलमडली : १२ प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच
प्रशांत हेलोंडे -ं वर्धा
ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली़ योग्य रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असते; पण डॉक्टर शासकीय नोकरी पत्करण्यास तयार नसतात़ परिणामी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे़ या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
वर्धा जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत़ या केंद्रांतर्गत आरोग्य उपकेंद्रही सुरू आहेत़ हा आरोग्याचा डोलारा सांभाळताना डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वॉर्ड बॉय, शिपाई ही संपूर्ण पदे भरलेली असणे गरजेचे आहे़ कर्मचारी व सुविधांनी परिपूर्ण आरोग्य केंद्रातूनच ग्रामस्थांना योग्य सेवा दिली जाऊ शकते; पण जिल्ह्यातील २७ पैकी १० प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ यात अन्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहेच़ यामुळे ग्रामीण रुग्णसेवा प्रभावित झाली आहे़
जि़प़ आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या १० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे़ संबंधित आरोग्य केंद्रांत रूजू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदव्यूत्तर पदवीच्या (एमडी) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे़ यामुळे ही पदे रिक्त झाली आहेत़ यात कन्नमवारग्राम, आंजी (मोठी), मांडगाव व वायफड येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे तर गौळ, सिंदी (रेल्वे), नंदोरी, साहूर आणि नाचणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत़ १० प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवा कोलमडली आहे़