१४ गावांचा कारभार चार कर्मचाऱ्यांवर
By Admin | Updated: November 17, 2014 22:59 IST2014-11-17T22:59:34+5:302014-11-17T22:59:34+5:30
देवळी पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात येत असलेल्या या पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक अडचणी आहेत. रात्री कर्मचारी गस्तीवर व दारू पकडण्याच्या कामात असल्याने

१४ गावांचा कारभार चार कर्मचाऱ्यांवर
वायगाव (नि.) : देवळी पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात येत असलेल्या या पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक अडचणी आहेत. रात्री कर्मचारी गस्तीवर व दारू पकडण्याच्या कामात असल्याने पोलीस चौकीला कुलूप असते. यामुळे रात्री उशिरा जर एखादी घटना घडली, तर नागरिकांना त्रासाला समोर जावे लागत आहे. या चौकीअंतर्गत १४ गावांचा कारभार असल्याने कोणता कर्मचारी कोणत्या वेळी कुठे राहील याचा नेम राहत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे.
गावाची लोकसंख्या चार हजाराच्या घरात आहे. येथे घडलेल्या वल्लभ भुतडा हत्याकांडामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या ठाण्याला दुचाकी दिली होती. या दुचाकीमुळे गावातील गल्लीबोळ्यातून गस्त घालणे सोपे जात होते. सध्या या चौकीची गाडी काढून घेतल्याने गल्ली बोळातील गस्त कमी झाली. येथील चौकीची ती गाडी परत घेत चौकीला मोठे वाहन देण्यात आले. हे मोठे वाहन गावाच्या आत फिरविता येत नसल्याने रात्रीची पोलीस गस्त बंद झाली. या चौकीत सध्या तीन कर्मचारी आणि एक अधिकारी कार्यरत आहे.
वायगाव पोलीस चौकीअंतर्गत पिंपळगाव (लुटे), सरूळ, चना (टाकळी), ममदापूर, आंबोडा (अजाब), सोनेगाव (बार्ई), अशी गावे आहेत. त्यात पोलीस कर्मचारी तीन व एक अधिकारी आहे. यात एक जमादार, दोन शिपाई व अधिकारी आठ तासानंतर घरी जातात. दोन कर्मचारी दारू पकडण्यासाठी गेल्यावर नाईलाजाने चौकी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने चौकी बंद राहते. यामुळे तक्रारीकरिता गेलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. वायगाव हे गाव मोठे असल्याने व अतिरिक्त १४ गावे येत असल्याने वाढती गुन्हेगारी व अवैद्य धंदे लक्षात घेता वायगाव पोलीस चौकीतील कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)