१.३५ लाखांचा गांजा जप्त
By Admin | Updated: February 25, 2017 00:43 IST2017-02-25T00:43:15+5:302017-02-25T00:43:15+5:30
वर्धा लोहमार्ग पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून दोन संशयीतांना ताब्यात घेतले.

१.३५ लाखांचा गांजा जप्त
दोघांना अटक : लोहमार्ग पोलिसांची कारवाई
वर्धा : वर्धा लोहमार्ग पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा १३ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कार्यवाही गुरूवारी रात्री करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी अमरावती येथील शैलेश राजाभाऊ मोहोड (२७) रा. वसंत टॉकीज व मोहम्मद जावेद मोहम्मद शाकीर (१८) रा. नुरनगर या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा लोहमार्ग पोलिसांची चमू रात्र गस्तीवर असताना सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर दोन तरुण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत विचारपूस करीत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा मिळून आला. लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही युवकांकडून १३ किलो ४९० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केला. जप्तीची कारवाई नायब तहसीलदार बर्वे यांच्या उपस्थितीत केली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. यापूर्वीही वर्धेत अमरावतीच्या युवकांना गांजासह अटक केली होती.(शहर प्रतिनिधी)