जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खत आणि बियाणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST2022-06-05T05:00:00+5:302022-06-05T05:00:06+5:30
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खत आणि बियाणे !
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाणांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
शेतीच्या हंगामात बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांच्या शेतकऱ्यांना उपलब्धतेसाठी रासायनिक खते व बियाणांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणांच्या संयुक्त सहकार्याने केल्यास रास्त किमतीत उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच वाहतूक खर्चात देखील बचत होणार आहे, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
यांच्यासोबत साधा संपर्क
जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख यांच्या वतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावात पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.