वृक्षारोपणावरील १३ लाखांचा खर्च व्यर्थ
By Admin | Updated: May 27, 2016 01:54 IST2016-05-27T01:54:51+5:302016-05-27T01:54:51+5:30
पर्यावरण संतुलनाकरिता व प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली.

वृक्षारोपणावरील १३ लाखांचा खर्च व्यर्थ
दुर्लक्षामुळे झाडे वाळली : ग्रा.पं. म्हणते झाडे जगली
गौरव देशमुख वायगाव (नि.)
पर्यावरण संतुलनाकरिता व प्रदूषणावर उपाय म्हणून शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत उद्देशानुसार ग्रामपंचायतीने १३ लाख ३ हजार १८२ रुपये खर्च करून २ हजार झाडे लावली. वृक्षारोपण झाले मात्र संगोपणाकडे दुर्लक्ष झाल्याने ती वाळली असताना ग्रामपंचायत प्रशासन त्यातील ७५ टक्के जगल्याची बतावणी करीत आहेत.
पर्यावरण संतुलित राहावे. गावे समृद्ध व्हावीत, सर्वत्र हिरवळ निर्माण व्हावी, याकरिता शासनही पुढाकार घेत आहे. शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. वायगाव (नि.) येथील रस्त्याच्या दुतर्फा २ हजार रोपटे लावण्यात आली. शासनाचा १३ लाख ३ हजार १८२ रुपयांचा खर्च करण्यात आला; मात्र लावलेल्या रोपातील किती जगली किती वाळली याचा सर्व्हे न करताच ग्रामपंचायत ७५ टक्के झाडे जगल्याचे सांगत आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता शासकीय यंत्रणा कागदोपत्री ते पूर्ण करतात. मात्र वास्तविकतेत किती झाडे लागली त्यातील किती जगली याचा कधी सर्व्हे झाला नसल्याचे दिसून आले आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत चौकशीची मागणी आहे.