१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट
By Admin | Updated: November 27, 2015 02:22 IST2015-11-27T02:22:34+5:302015-11-27T02:22:34+5:30
अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले.

१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट
कालव्याचे पाणी शिरले शेतात : २० ते २५ लाख रुपयांनी फटका
आर्वी : अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले. नादुरूस्त कालव्याचे पाणी शेतात शिरल्याने १३ शेतकऱ्यांच्या ६५ एकर शेतातील तूर पीक पूर्णत: नष्ट झाले. यात शेतकऱ्यांचे तब्बल २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कालवा दुरूस्त करण्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली; पण संबंधित विभाग त्यासाठीही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.
तालुक्यातील अंबिकापूर-वाठोडा मार्गावर उर्ध्व डावा कालवा क्र. पाच आहे. या कालव्यातून परिसरातील शेतकऱ्यांना पाणी वितरित केले जाते. दोन दिवसांपूर्वी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. वितरिका नादुरूस्त असल्याने सोडलेले पाणी पुढे न जाता थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यामुळे सुमारे १३ शेतकऱ्यांच्या ६० हेक्टर शेतातील तुरीच्या पिकांची धुळधान झाली आहे. तुरीचे पीक फुलावर आले होते. अचानक पाणी सोडले गेल्याने पिकच खराब झाले आहे. अंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके यांच्या शेतात कालवा अर्धवट सोडून देण्यात आला आहे. या कालव्याचे पाणी नदीत सोडणे गरजेचे होते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी उर्ध्व वर्धा डावा कालवा विभागाकडे कालव्याची वितरिका नदी सोडण्याची लेखी विनंती केली होती; पण संबंधित विभागाने टाळाटाळ करीत समस्या निकाली काढली नाही. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्याने या कालव्याचे पाणी दोन दिवसांपूर्वी सोडले. दुरूस्ती न करताच पाणी सोडल्याने कैलेकु यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले. शिवाय १३ शेतकऱ्यांच्या शेतात तळे साचले. शेतकऱ्यांनी संबंधित विभागात धाव घेतली असता वितरिका बंद करण्यात आली; पण तोपर्यंत पिकांची धुळधाण झाली होती. या प्रकरणी उपविभागीय कार्यकारी अभियंता गावंडे यांना माहिती देण्यात आली; पण कारवाई करण्यात आली नाही.
१५ दिवसांपूर्वी पीडित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देत बुजलेल्या वितरिकेच्या दुरूस्तीची मागणी केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले. आता शेतकऱ्यांनी हरकत घेतली असताना लघु कालव्यातून पाणी सोडले. शेतकऱ्यांनी आमदार अमर काळे यांचीही भेट घेत न्यायाची मागणी केली. उर्ध्व वर्धा डाव्या विभागांतर्गत सात लघु कालवे व एक मुख्य वितरिका आहे. या विभागात पाणी सोडण्यासाठी एकच कर्मचारी असून त्याच्याकडे ७ ते १३ किमीचे अंतर दिले. यामुळे रात्री-अपरात्री कालव्यात तांत्रिक अडचण आल्यास त्याचे त्वरित निसरण होत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
हातचे पीक जाण्याच्या धास्तीमुळे शेतकरी चिंतेत
अंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके ३ एकर तूर, कृष्णराव खोंडे २ एकर, मारोतराव कैलुके ३ एकर, रामदास कैलुके ६ एकर, प्रदीप काळे १० एकर, साहेबराव खोंडे ५ एकर, अनिल खोंडे १४ एकर, विठ्ठल गवळीकर ३ एकर, किसन कैलुके ७ एकर, रमेश कैलुके २ एकर, किसना कैलुके २ एकर, नारायण कैलुके ६ एकर आणि विनायक कैलुके २ दोन एकर अशा ६५ एकर शेतातील तूर पीक खराब झाले आहे. हातचे पीक जाणार असल्याने शेतकरी धास्तावले आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे झाले आहे.
कॅनलच्या पाण्यामुळे १४ एकरातील तूर पूर्णत: खराब झाली आहे. शेतात पाणी साचले आहे. यात सुमारे २ लाखांच्या वर नुकसान झाले. संबंधित विभागाने हे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी अंबिकापूर येथील पीडित शेतकरी प्रवीण खोंडे यांनी केली आहे.
इतर शेतकऱ्यांची मागणी असल्याने पाणी सोडण्यात आले; पण आता या वितरिकेचे पाणी वितरण पूर्णत: बंद केले आहे. या कॅनलचे अखेरचे टोक शेतकऱ्याने बुजविले आहे. या वितरिकेचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यासाठी टेलिंग मशीन पाठविली होती. या मुख्य वितरिकेचे गेट रात्री कुणीतरी सोडल्याने समस्या उद्भवली. गत नऊ वर्षांपासून या कॅनलच्या वितरिकेवर पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
- पी.बी. खुजे, सहायक अभियंता, उर्ध्व वधा डावा कालवा, उपविभाग, आर्वी.