मृतकाच्या कुटुंबाला १२.५० लाख
By Admin | Updated: April 8, 2016 01:59 IST2016-04-08T01:59:16+5:302016-04-08T01:59:16+5:30
तालुक्यातील जाम येथील पी.व्ही. टेक्साटाईल्स कंपनीमध्ये अंगावर ३७५ किलो गठाण पडून कामगार दिवाकर दत्तोबा चौधरी (५२) याचा मृत्यू झाला.

मृतकाच्या कुटुंबाला १२.५० लाख
कामगारांचे कामबंद आंदोलन : दोन्ही मुलांना नोकरी, चार तासांच्या वाटाघाटीनंतर निर्णय
समुद्रपूर : तालुक्यातील जाम येथील पी.व्ही. टेक्साटाईल्स कंपनीमध्ये अंगावर ३७५ किलो गठाण पडून कामगार दिवाकर दत्तोबा चौधरी (५२) याचा मृत्यू झाला. मृतक कामगाराच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. दोन हजार कामगारांनी चार तास गेटवर ठिय्या मांडला. अखेर मृतकाच्या कुटुंबाला १२ लाख ५० हजार रुपये व दोन मुलांना नोकरी देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.
बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास कामगार कच्च्या मालाच्या गठाणी मिक्सींग विभागामध्ये नेत होते. ३० ते ३५ फुट उंचीने या गठाणी मशीनद्वारे रचल्या जातात. सदर गठाणींचे वजन हे ३७५ किलोपर्यंत असते; पण उपयोगात आणण्याकरिता कामगार स्वत: त्या गठाणीला धक्का देत पैलीवर घेऊन मिक्सींग विभागात नेतात. तत्सम काम सुरू होते. गठाणीला चार कामगार पैली नेत असताना अचानक तीन गठाणी पडल्या. यातील एक गठाण थेट दिवाकर चौधरीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपये, दोन मुलांना नोकरी देण्याची मागणी कामगारांनी केली होती; पण नोकरीप्रमाणे जेवढे निघेल, तेवढीच रक्कम मिळेल या निर्णयावर व्यवस्थापन ठाम होते.
अखेर गुरूवारी सकाळी कामगार नेते माजी आमदार राजू तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी, पं.स. उपसभापती अशोक वांदिले, सभापती हिम्मत चतूर, प्रहारचे गजू कुबडे, नरेंद्र थोरात, महेश झोटींग, शांतीलाल गांधी, प्रदीप डगवार, जामचे उपसरपंच आशिष अंड्रस्कर तथा युवानेते सचिन गावंडे, महादेव बैलमारे, सनी निवटे, कामगार युनियनचे अध्यक्ष नरेंद्र रघाटाटे, सदस्य प्रमोद शेंडे, सुनील कणकरीया, मनीष सुरे, अरविंद गुरनुले यांच्यासह दोन हजार कामगार काम बंद करून कंपनीच्या गेटसमोर येऊन बसले.
व्यवस्थापन चर्चेला तयार झाल्यावर नेते व कामगारांच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापन प्रतिनिधी पारसमल मुनोत, व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे, जयंत धोटे यांच्याशी दोन तास चर्चा केली. अखेर १२ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देणे मान्य असल्याचे भुपेंद्र शहाणे यांनी सांगितले. या निर्णयानंतर कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला होता. यात हिंगणघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस निलोत्पाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, समुद्रपूरचे ठाणेदार रणजीतसिंह चव्हाण, गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, हिंगणघाटचे ठाणेदार बोडखे, पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, उमेश हरणखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.(तालुका प्रतिनिधी)