२३ एकरातील कपाशीच्या एका झाडाला १२५ बोंडे
By Admin | Updated: November 4, 2014 22:45 IST2014-11-04T22:45:48+5:302014-11-04T22:45:48+5:30
म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली.

२३ एकरातील कपाशीच्या एका झाडाला १२५ बोंडे
आदर्श शेतीकडे वाटचाल : कृषी विभागानेही केली पाहणी
आष्टी (श़) : म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली. नियोजन केल्याने कपाशीची झाडे ७ ते ८ फुट वाढली असून एका झाडाला १२५ च्या वर बोंडे आहेत़ या आदर्श शेताला कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली़ शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देशही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले़
बेलोरा (खुर्द) येथील प्रगतशील शेतकरी हरिकिसन चांडक ऊर्फ रामराम महाराज यांनी आध्यात्मिक मार्गाने समाज प्रबोधनाचे नि:शुल्क काम सुरू केले. अनेक गावांत भागवत सप्ताह घेऊन लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केले. सोबतच शेतीला चांगले दिवस यावे, तरूणांनी खेड्याकडे वळावे म्हणून रामराम महाराजांनी शेती करण्याचे ठरविले़ उन्हाळ्यापासूनच शेतात थांबून नियोजन केले. सेंद्रीय शेतीचा मार्ग निवडला. पाणी, खत, बियाणे स्वत:च ठरविल्या. प्रत्येक एकरात पाच बाय पाच फुट अंतराने एकरी ७ हजार २५० झाडे लावली. वाढीसाठी जागा मिळाल्याने व खत, पाणी भरपूर मिळाल्याने कपाशी वाढली़ निंदणाऐवजी तण नाशकाचा वापर केला़ कपाशीची झाडे १० फुट वाढावी म्हणून बांबुचा मांडव टाकणे सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्ह्यात कपाशी पिकांची पाहणी करीत आहे़ यात रामराम महाराजांची आदर्श शेती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची असल्याचे त्यांनी सांगितले. अंबोडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांनी प्रती क्विंटल ४८ क्विंटल कपाशीचे उत्पन्न घेतले. यावरून महाराजांनी आदर्श शेतीचा संकल्प केला होता, असे रामराम महाराज सांगतात़ प्रती एकर ५० क्विंटल उत्पन्न घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाने, तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे आष्टी, प्रमोद खेडकर आर्वी, व्ही.बी. महंत कारंजा यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)