१.१८ लाख बालकांना पोलिओची लस
By Admin | Updated: January 8, 2016 02:43 IST2016-01-08T02:43:12+5:302016-01-08T02:43:12+5:30
जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात एकूण १ लाख १७ हजार ७७६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

१.१८ लाख बालकांना पोलिओची लस
आशुतोष सलिल : पोलिओ लसीकरणाविषयी समाजात जागृती करा
वर्धा : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात एकूण १ लाख १७ हजार ७७६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यात १ हजार ३३७ केंद्रात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात १ हजार १३८ व शहरी भागात ११९ केंद्रे असून ३२६७ कर्मचारी व २६७ पर्यवेक्षक नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोएिशनचे अभिषेक वोरा, सुहास इंगळे, डॉ. आशीष वर्मा, आर.पी. साठोणे, पडोळे, रोटरी क्लबचे राहुल सराफ, महेश पोद्दार, एन.पी. वानखेडे, अल्ताफ, जामा मशिदीचे सचिव सय्यद आसिफ अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते. १७ जानेवारी व २१ फेब्रुवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक वंचित राहणार नाही. याकरिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, बस व रेल्वेस्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात यावे. बसगाड्यामध्ये स्टिकर्स लावण्यात यावे, दूरदर्शन व केबलवरून जाहिरात करण्यात यावी, रेडीओ एमगिरीवरून जाहिरात करण्यात यावी, मशिदीवरून माईकिंग अशा विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी मोहिमेकरिता आखलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.(प्रतिनिधी)