पोकलॅन्ड, ट्रक, ट्रेलरसह ११० ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:06+5:30
हिंगणघाट तालुक्यातील कापसी शिवारात अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन मंडळ अधिकारी, चार तलाठी, एक शिपाई, एक कोतवाल, दोन पोलीस शिपाई तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागात छापा टाकला असता तेथे अवैध उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोकलॅन्ड, ट्रक, ट्रेलरसह ११० ब्रास वाळू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गोपनीय माहितीच्या आधारे वनविभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागातील वर्धा नदी पात्रात कारवाई करून पोकलॅन्ड, ट्रक, ट्रेलरसह ११० ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली असून सदर कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कापसी शिवारात अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन मंडळ अधिकारी, चार तलाठी, एक शिपाई, एक कोतवाल, दोन पोलीस शिपाई तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागात छापा टाकला असता तेथे अवैध उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिकारी येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक पोकलॅन्ड, एम. एच. ४६ एच. ६००७ क्रमांकाचा ट्रेलर, एम. एच. ३१ सी. बी. २९८१ क्रमांकाचा ट्रक तसेच ११० ब्रास वाळू जप्त केली. जप्त केलेली वाहने तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. अवैध उत्खन्नासह वाहूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा पोकलॅन्ड व ट्रेलर हा वर्धा येथील वाळू माफिया अभिनव कापसे यांच्या मालकीचा असल्याचे आणि जप्त करण्यात आलेला ट्रक बंडू उमाटे रा. वरूड यांच्या मालकीचा असल्याचे अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, हिंगणघाट येथील वनक्षेत्र सहाय्यक शेख, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, मन्नुलाल भलावी, तलाठी विलास राऊत, स्वप्निल देशमुख, प्रेमसिंग बिमरूट, दीपक अंधारे, अभिष रामटेके, धनराज झाडे, कोतवाल दिनेश कोहपरे, नय्युम शेख, गजानन काळे, सुनील पाऊलझाडे यांनी केली.
जप्त केलेली वाळूची किंमत ४.१८ लाखांच्या घरात
सदर वाळू माफिया वर्धा नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करून त्याची साठवणूक वनविभागाच्या मालकीच्या जागेवर करीत होते. सदर कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी वाळूचे पाच ढिग जप्त केले आहे. हा वाळूसाठा सुमारे ११० ब्रास असून त्याची शासकीय किंमत ४.१८ लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
दंडही ठोठावला
सदर प्रकरणात पोकलॅन्ड आणि ट्रेलर मालकांना कायदेशीर नोटीस बजावून प्रकरणात ११० ब्रास रेतीसाठी स्वामित्व धनासह प्रतीब्राससाठी २२ हजार ९०० रुपये प्रमाणे एकूण २५.१९ लाख दंड व पोकलॅन्ड मशीनसाठी जुर्माना म्हणून ७.५० लाख तसेच ट्रकसाठी २.०० लाख जुर्माना सह पोकलॅन्ड मशीन शासन जमा करण्याची कार्यवाही संबंधीतांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर करण्यात येणार आहे. तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
चार वाहनांनी काढला वर्ध्याकडे पळ
कारवाईसाठी अधिकाऱ्यांचे पथक आल्याची माहिती मिळताच चार डंपर चालकांनी वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. हे चारही मालवाहू वर्धा येथील वाळू माफियांचे असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांना असून या वाळूमाफियांचा शोध अधिकारी घेत आहेत. गोपनीय माहिती घेऊन या वाळू चोरट्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.