सेविका व मदतनिसांची ११ पदे रिक्त
By Admin | Updated: January 1, 2015 23:07 IST2015-01-01T23:07:19+5:302015-01-01T23:07:19+5:30
शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र सुरू केले़ शिवाय यातून कुपोषण दूर सारण्याचे प्रयत्नही होत आहेत; पण शासनाच्या

सेविका व मदतनिसांची ११ पदे रिक्त
वर्धा तालुक्यातील स्थिती : पूर्व प्राथमिक शिक्षण व कुपोषणमुक्तीला अडथळा
वर्धा : शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र सुरू केले़ शिवाय यातून कुपोषण दूर सारण्याचे प्रयत्नही होत आहेत; पण शासनाच्या या प्रयत्नांना रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसते़ वर्धा तालुक्यातील तब्बल ११ पदे रिक्त असल्याने बालकांच्या संगोपन, पूर्व प्राथमिक शिक्षण व कुपोषण मुक्तीच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
बालकांचे कुपोषण दूर करता यावे, पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून पौष्टीक आहार व खाद्य पुरवठ्यावर विशेष भर दिला जात आहे. बालकांना शिक्षण देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविका व तिच्या सोबतीला मदतनिस यांची निवड करण्यात आली आहे. साधारण ३ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी तालुक्यातील अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात एक अंगणवाडी सेविका व मदतनिस कार्यरत असते़
वर्धा तालुक्यात २७० अंगणवाडी केंद्र तर ७ मिनी अंगणवाड्या आहे; पण गत काही महिन्यांपासून ३ अंगणवाडी सेविका तर ८ मदतनिसांची पदे रिक्त आहे़ यामुळे त्या अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने पूर्व प्राथमिक शिक्षण व संगोपणाकरिता प्रारंभी बालवाडी सुरू केली. त्यात सुधारणा करून अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली़
अंगणवाडीचे काम योग्यरित्या चालावे याकरिता केंद्र व राज्य शासनाद्वारे मानधन तत्वावर सेविका व मदतनिसांची नियुक्ती केली़ संबंधित ग्रा़पं़ क्षेत्रात येणाऱ्या महिलांची अंगणवाडी सेविका व मदतनिस म्हणून निवड केली जाते.
(तालुका प्रतिनिधी)