सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
By Admin | Updated: March 22, 2015 01:54 IST2015-03-22T01:54:08+5:302015-03-22T01:54:08+5:30
भोयर-पवार विद्यार्थी मंडळाच्यावतीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून शनिवारी सामाजिक दायित्व जोपासून सातवा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला़ ...

सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
कारंजा (घा़) : भोयर-पवार विद्यार्थी मंडळाच्यावतीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून शनिवारी सामाजिक दायित्व जोपासून सातवा सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला़ भोयर-पवार समाज भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात परिसरातील ११ जोडपी विवाहबद्ध झालीत. लग्नाचा खर्च, वेळ व त्रास वाचवून समाजापुढे आदर्श घालून दिला. राष्ट्रसंत तुकडोजींचे जीवन तत्वज्ञान अंगीकारले.
सोहळ्याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजाचे ज्येष्ठ नेते बद्रीनारायण चोपडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले़ यावेळी अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती, चेतना मानमोडे, जि.प. सदस्य गोपाल कालोकर, शुभांगी पठाडे, तेजराव बन्नगरे, सारिका खवशी, प्रमिला चौधरी, सुरेश देशमुख, मुरलीधर टेंभरे, कर्नल अरुण पठाडे मुंबई, भास्कर मानमोडे, बीडीओ पवन कडवे, प्रा. भगवान बन्नगरे आदी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. भगवान बन्नगरे यांनी मंडळाच्या कार्याचा पाढा वाचला. ‘शेतकरी वर्ग’ आणि समाज अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असल्यामुळे लग्नाचा खर्च, वेळ आणि श्रम वाचविण्याकरिता राष्ट्रसंतांनी सांगितलेला सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उपयुक्त आहे़ ती काळाची गरज असल्याचा सल्ला खासदार तडस, आ. काळे, केचे यांनी दिला.
मान्यवरांनी सर्व वर-वधूंचे लग्न लावून आशीर्वाद दिले़ सोहळ्याचे संचालन सचिव बंडू पराडकर यांनी केले. याप्रसंगी वैभव रमेश बारंगे हा युवक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपनिरीक्षक झाल्याबद्दल त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता भोयर-पवार विद्यार्थी मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व समाज युवकांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)