वन्यप्राण्यांनी १,७०८ शेतकऱ्यांचे केले नुकसान
By Admin | Updated: May 1, 2017 00:38 IST2017-05-01T00:38:52+5:302017-05-01T00:38:52+5:30
जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

वन्यप्राण्यांनी १,७०८ शेतकऱ्यांचे केले नुकसान
चार महिन्यांत चार इसमांसह ५४ जनावरे केले जखमी
वर्धा : जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. गत चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी चक्क १ हजार ७०८ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. तर चार इसमांसह ५४ जनावरांना जखमी केल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे.
जखमीच्या कुटुंबियांना व नुकसानग्रस्त बहुतांश पशुपालक तसेच शेतकऱ्यांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याचदा वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करतात. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात जनावरे दगावत असून अनेकदा जनावरे जखमीही होतात.
वन्यप्राण्यांकडून शेतपिकाचे होणारे नुकसान, जनावरे जखमी केल्यास तसेच जनावरे मारली गेल्यास संबंधीतांना वनविभागाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्रात २५७ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, आष्टी(श.) वनपरिक्षेत्रात १९३, कारंजा(घा.)त ७१०, समुद्रपूर १६३, हिंगणी १९१, तळेगाव ५०७, खरांगणा १३६ व वर्धा वनपरिक्षेत्रातील ११५५ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. सदर शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत एकूण १ कोटी ९० लाख ८३ हजार ४८७ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत वन्यप्राण्यांनी ३२ मनुष्यांना जखमी केले. सदर जखमींच्या कुटुंबियांना एकूण १९ लाख २५ हजार ७९१ रुपयांची शासकीय मदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
दिवसेंदिवस वन्यप्राणी शेतशिवारांमध्ये येत धुमाकुळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने योग्य पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)
हिंगणी क्षेत्रात जनावरांवर सर्वाधिक हल्ले
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आर्वी १८, आष्टी(श.) ४, कारंजा(घा.) १७, समुद्रपूर ७, हिंगणी ४७, तळेगाव १४, खरांगणा २० व वर्धा वनपरिक्षेत्रात ३ जनांवरांना वन्यप्राण्यांनी जखमी केले. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना मार्च अखेरपर्यंत ७ लाख ९५ हजार ९०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.