१०१ टॉवरचे जाळे; सेवा मात्र हॅलो..हॅलो.. पुरतीच
By Admin | Updated: February 27, 2017 00:28 IST2017-02-27T00:28:08+5:302017-02-27T00:28:08+5:30
भारतीय दूरसंचार निगमचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याकरिता जिल्ह्यात एकूण १०१ टॉवर उभारले आहे.

१०१ टॉवरचे जाळे; सेवा मात्र हॅलो..हॅलो.. पुरतीच
बीएसएनएलचे रडगाणे : एक बंद करून होतो दुसरा टॉवर सुरू
रूपेश खैरी वर्धा
भारतीय दूरसंचार निगमचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याकरिता जिल्ह्यात एकूण १०१ टॉवर उभारले आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे जाळे मोठे आहे; मात्र आवश्यक प्रमाणात सेवा पुरविण्याकरिता देखभाल दुरूस्तीचा खोडा आडवा येत आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएलचे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांचा संवाद रेंजअभावी हॅलो.. हॅलो.. पर्यंतच सिमीत राहत असल्याचे वास्तव आहे.
बीएसएनएलची टॉवर सेवा सांभाळण्याकरिता जिल्ह्यात केवळ दोन कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यात पसरलेले दूरसंचारचे जाळे सांभाळले जात आहे. या दोघांत एक वरिष्ठ आणि दुसरा कनिष्ठ अशी स्थिती आहे. त्यांना मोबाईल टॉवर आणि लॅण्डलाईनचे बिघाड या दोन्हींची देखभाल करावी लागते. केवळ कर्मचारीच नाही तर टॉवरच्या देखभाल दुरूस्तीकरिता आवश्यक साहित्याचीही येथे बोंब आहे. मोबाईल ग्राहकांची अधिक वाहतुकीच्या एखाद्या टॉवरची सेवा विस्कळीत झाली तर तिथे कमी वाहतूक असणाऱ्या टॉवरचे साहित्य काढून लावण्यात येते. यामुळे एकाच्या दुरूस्तीत दुसरा बंद पडतो, अशी स्थिती आहे. या प्रकारातून आतापर्यंत १० टॉवर बंद पडले. केवळ ९१ टॉवर कार्यरत असल्याचे संचारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ९१ टॉवर असतानाही सेवेचे मात्र तीनतेराच वाजले आहे.
सध्या सुरू असलेल्या ९१ टॉवरपैकी २३ टॉवर थ्रीजी सेवा पुरविणारे आहेत. तर १६ टॉवर सीडीएमए मोबाईल धारकांना सेवा देत आहेत. उर्वरीत टॉवर टूजी आणि इतर प्रकारातील ग्राहकांना सेवा देत असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढे मोठे जाळे असताना आता आॅनलाईन होण्याच्या बाता करणाऱ्या शासनाने या शासकीय दुरसंचार कंपनीचे दुखणे दूर करण्याची वेळ आली आहे.