१०० रुपयांच्या मुद्रांकावरील आपसी वाटणीपत्रे रखडली
By Admin | Updated: December 8, 2014 22:38 IST2014-12-08T22:38:18+5:302014-12-08T22:38:18+5:30
शेतजमिनीचे आपसी वाटणीपत्र १०० रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. असे असताना येथील तहसीलदार कार्यालयात काही महिन्यांपासून अनेक प्रकरणे दुर्लक्षित आहेत.

१०० रुपयांच्या मुद्रांकावरील आपसी वाटणीपत्रे रखडली
तहसीलदारांना निवेदन : दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशारा
हिंगणघाट : शेतजमिनीचे आपसी वाटणीपत्र १०० रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. असे असताना येथील तहसीलदार कार्यालयात काही महिन्यांपासून अनेक प्रकरणे दुर्लक्षित आहेत. या प्रकरणाचा निपटारा दहा दिवसात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे पूर्व विदर्भ विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी दिला आहे.
शासनाचे १५ मे १९९७ च्या परिपत्रकानुसार शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तावेजासाठी १०० रुपयांचे मुद्रांक शुल्क निश्चित केले. उच्च न्यायालयाच्या ३० जून २००६ च्या निकालानुसार सदर वाटणी पत्राची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करणे आवश्यक नाही, असे असतांना जिल्ह्यात १०० रुपयांच्या मुद्रांकावर शेतजमिनीच्या वाटणीपत्राची तलाठी दप्तरी नोंद घेतल्या जात नव्हती. याविरोधात जिल्ह्यात झालेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी यांनी ७ जुलै २०१४ रोजी सर्व तालुका महसूल अधिकारी यांना यासंबंधी निर्देश दिले होते.
अनेकांनी शेतजमिनीचे वाटणीपत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करून तलाठ्यांकडे सादर केलीत; परंतु पाच महिन्यात एकही आपसी वाटणीचा फेरफार घेण्यात आला नाही. त्यामुळे या दिरंगाईला जबाबदार कोण असा प्रश्न प्रा. गमे यांनी केला आहे. तालुक्यातील सर्व प्रलंबीत आपसी वाटणीपत्राचे दहा दिवसांत फेरफार घेण्यात यावे अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)