प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत १० हजार बचत खाते
By Admin | Updated: August 29, 2014 00:00 IST2014-08-29T00:00:46+5:302014-08-29T00:00:46+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत.

प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत १० हजार बचत खाते
प्रत्येक कुटुंबाचे बचतखाते : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पासबूक
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. बचतखाते उघडलेल्या खातेदारांना बँकेचे पासबुक जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना बँकेच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे सुलभ व्हावे त्यादृष्टीने अशा कुटुंबांना प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच शेवटच्या घटकापर्यंत बँक प्रतिनिधी मार्फत बँकेच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिपप्रज्वलीत करून व बचतखाते उघडलेल्या कुटुंबांना बँकेचे पासबुक देवून या योनजेचा शुभारंभ केला. अग्रणी बँकेचे अनंत भिसे यांनी प्रधानमंत्री जन-धन याजनेबद्दल माहिती दिली. अध्यक्षस्थानी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. दादाराव केचे उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक अनंत भिसे व सर्वच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक व्हि.के. जांगडा यांनी मानले. यावेळी निशिकांत घईसास, आर.आर.जोशी, एन.के.देवपुजारी, वसंत पाठक, स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक वाहीद, लाडे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे सील, बँक आॅफ इंडियाचे नायक, नाबार्डच्या डॉ.स्रेहल बन्सोड तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, जिवन विमा निगमचे निराळे, वर्षा चिंचखेडे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या पहिल्याच दिवशी बँक आॅफ इंडियातर्फें एक हजार ३५५, स्टेट बँक आॅफ इंडिया तीन हजार ०९६, सेंट्रल बँक एक हजार, आयडीबीआय एक हजार ५० तसेच पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, एचडीएफसी, बँक आॅफ महाराष्ट्र, विजया बँक, आंध्र बँक आदी बँकांनी १० हजारपेक्षा जास्त बचतखाते उघडून आपला सहभाग दिला.
या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे झिरो बॅलन्स या तत्वावर बँकखाते उघडण्यात येणार असून, या खात्यांना एक लक्ष रुपयाचा अपघात विमा योजना लागू राहणार आहे. तसेच सहा महिन्यापर्यंत बँकेच्या सुविधांचे लाभ घेतानाच एक हजार रुपये बँकेत जमा करण्यात येतील. त्यावर नियमित व्याज भरणाऱ्या खातेदारांना पाच हजार रुपयांपर्यंत बँकेत व्यवहार करता येतील. बचतखाते, मतदार ओळखपत्र, जॉब कार्ड, आधार कार्ड, अथवा सरपंचाद्वारे दिलेल्या ओळखपत्राद्वारे बँकेत खाते उघडू शकेल. या योजनेमुळे आर्थिक स्वावलंबन व बचत करण्याची सवय जनतेमध्ये निर्माण होईल. दोन हजार लोकसंख्येच्या आत असलेल्या गावांमध्ये बँक प्रतिनिधी मार्फत बचतखाते उघडून सर्व सुविधा घरापर्यंत देण्यात येणार आहे.